खामखेड्यात उपचाराअभावी वासराचा मृत्यू
By Admin | Updated: March 17, 2016 23:53 IST2016-03-17T23:49:20+5:302016-03-17T23:53:34+5:30
खामखेड्यात उपचाराअभावी वासराचा मृत्यू

खामखेड्यात उपचाराअभावी वासराचा मृत्यू
खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात अनेक वर्षांपासून पशुवैद्यकीय डॉक्टर नसल्याने उपचाराअभावी येथील शेतकऱ्यांना आपली महागडी जनावरे गमावावी लागत आहेत. पशुवैद्यकीय अधिकारी देण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेचे लोहोणेर विभागप्रमुख प्रशांत शेवाळे, शाखाप्रमुख अनुप शेवाळे यांनी केली आहे.
येथे अनेक वर्षांपासून पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने दवाखान्याचा सर्व कारभार वैद्यकीय अधिकाऱ्यांशिवाय सुरू आहे. चालू वर्षी खामखेडा गावाचा कामधेनू दत्तक योजनेत समावेश झाल्याने पूर्णवेळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्याअभावी कामधेनूचे कितपत पशुधन वाढीस होईल, याबाबत पशुपालक शेतकऱ्यांमध्ये शंका आहे.
पूर्वी खामखेडा गावाचा कळवण तालुक्यात समावेश होता; मात्र आता देवळा तालुक्यात समावेश करण्यात आल्यानंतर या दावाखान्यास कायमस्वरूपी निवासी वैद्यकीय अधिकारी मिळाला नाही. सध्या या दवाखान्यात एक व्रणोपचारक व दोन शिपायांच्या भरवशावर काम चालू आहे. दवाखान्यात आणलेल्या जनावरांवर ते तात्पुरत्या स्वरूपाचे उपचार करतात. दवाखान्याचा अतिरिक्त पदभार दहीवड येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. साळवे यांच्याकडे असल्याने ते आठवड्यातून एक दिवस खामखेडा येथे येतात. शेतकऱ्यांना आपल्या महागड्या पशुधनावर वेळेवर इलाज करण्यासाठी खासगी पशुवैद्यकीय डॉक्टरांना बोलवून उपचार करावा लागत आहे.
दवाखान्यातील व्रणोपचारक भोई यांनी अनुप याच्या मळयात जाऊन गायीची तपासणी करून, अनुप यांना डॉ. साळवे यांचा फोन नंबर देऊन डॉक्टरांना बोलावण्यास सांगितले.
मात्र त्यांचा फोन लागला नाही. रात्रभर गाईचे उपचाराविना हाल झाले. शेवटी सकाळी खासगी डॉक्टरांना बोलविले. तोपर्यंत वासरू गाईच्या पोटात मेले होते. गायच्या पोटातील मृत वासरू काढण्यात येऊन, गाईचा जीव वाचवण्यात आला.
गाईला वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे वासरू वाचू न शकल्याने शेतकऱ्यामध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच गाईचेही यात हाल झाले.
खामखेडा येथील दवाखान्यात ताबडतोब निवासी पशुवैद्यकीय अधिकारी नेमण्यात यावा नाहीतर दवाखान्याला कुलूप लावण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे
माजी विभागप्रमुख प्रशांत
शेवाळे आणि शाखाप्रमुख
अनुप शेवाळे यांनी दिला आहे. (वार्ताहर)