लैंगिक अत्याचार करून काकाने केला पुतणीचा खून
By Admin | Updated: April 25, 2017 02:40 IST2017-04-25T02:40:01+5:302017-04-25T02:40:11+5:30
दिंडोरी/वणी : माळेदुमाला येथे बालिकेवर चुलत काकानेच लैंगिक अत्याचार करून अल्युमिनिअमच्या तारेने गळा आवळून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला

लैंगिक अत्याचार करून काकाने केला पुतणीचा खून
दिंडोरी/वणी : तालुक्यातील माळेदुमाला येथे आठवर्षीय बालिकेवर चुलत काकानेच लैंगिक अत्याचार करून अल्युमिनिअमच्या तारेने गळा आवळून खून केल्याचा प्रकार सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीस आला. संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यास आमच्या हवाली करीत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेत नातलग व गावकऱ्यांनी वणी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. दरम्यान, माळेफाटा येथे संतप्त गावकऱ्यांनी रास्ता रोको केल्याने बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास एका आठवर्षीय बालिकेला घरच्यांनी तंबाखूची पुडी आणण्यासाठी दुकानात पाठविले होते. बराच वेळ झाला तरी मुलगी घरी न आल्याने तिच्या आईने दुकानात जाऊन चौकशी केली असता तिला जाऊन बराच वेळ झाल्याचे दुकानदाराने सांगितले. त्याचवेळी संशयित विलास अण्णासाहेब महाले (३०) हादेखील दुकानात उपस्थित होता. ‘काय झाले’ अशी विचारणा करून ‘मीसुद्धा तिला तंबाखूची पुडी आणावयास सांगितले होते’, असे मयत बालिकेच्या आईला सांगून तेथून तो पसार झाला. नातेवाइकांनी शोधाशोध करूनही बालिकेचा ठावठिकाणा न लागल्याने संशयिताच्या घरास कुलूप बघून नातेवाइकांचा संशय बळावला. त्यांनी घराचे कुलूप तोडून बघितले असता सदर बालिका मृत अवस्थेत
आढळून आला. याप्रकरणी मयत बालिकेच्या आई-वडिलांनी वणी पोलिसात फिर्याद दिल्यानंतर
पोलीस निरीक्षक अनंत तारगे व सहकारी दाखल झाले.वणी ग्रामिण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. रोहन मोरे व डॉ राजेंद्र बागुल यांनी शवविच्छेदन केले.
संशयीत फरार झाल्याने वणी पोलीसांनी स्थानिक गुन्हे अन्वेशन विभाग नाशिकला कळविले. त्यांनी संशयित विलास अण्णासाहेब महाले याच्या मोबाईलचे लोकेशन घेऊन त्यास बोरगांव येथे ताब्यात घेतले. यावेळी मयत बालिकेच्या नातेवाईकांनी व गांवक-यानी वणी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून संताप व्यक्त केला. संशयिताला आमच्या हवाली केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. कळवण विभागाचे पोलीस उपअधिक्षक देविदास पाटील व तारगे यांनी नातेवाईकांची समजुत काढण्याचा प्रयत्न करीत असुन गांवक-यानी माळेफाटा या ठिकाणी रास्ता रोको करून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. या प्रकाराने वातावरण तापलेले असुन माळे गावात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.