व्यापारी भीतीग्रस्तबाजार समितीत लूट : कारवाईची मागणी
By Admin | Updated: November 27, 2014 22:51 IST2014-11-27T22:50:50+5:302014-11-27T22:51:07+5:30
व्यापारी भीतीग्रस्तबाजार समितीत लूट : कारवाईची मागणी

व्यापारी भीतीग्रस्तबाजार समितीत लूट : कारवाईची मागणी
पंचवटी : वाहनाला कट मारल्याची कुरापत काढून दुचाकींवरून आलेल्या चौघा भामट्यांनी दिंडोरीरोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्याच्या वाहनातून जवळपास चार लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घडल्याने सध्या व्यापारीवर्गात भीतीचे वातावरण आहे.
अवघ्या काही मिनिटांत रोकड चोरून दुचाकीवरून पलायन करणाऱ्या संशयितांच्या शोधासाठी पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने प्रयत्न केला असला, तरी त्यांना तूर्तास यश आलेले नाही. रोकड चोरणारी टोळी यापूर्वीही बाजार समितीच्या आवारात कार्यरत होती व आजमितीसही असावी हे बुधवारी भरदिवसा बाजार समितीत घडलेल्या घटनेवरून पुन्हा स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, बाजार समितीत येणाऱ्या व्यापारी तसेच शेतकऱ्यांची लूटमार होऊ नये, त्यांचा भाजीपाला, रोकड तसेच मोबाइल चोरी होऊ नये म्हणून बाजार समितीत पोलीस कर्मचारी तर नेमलेच आहेत, शिवाय त्यांच्या जोडीला बाजार समितीचे सुरक्षारक्षक आहेत. याशिवाय बाजार समितीच्या आवारात तिसरा डोळा म्हणजेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले असले, तरी त्यानंतरही असे प्रकार घडत असल्याने व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. बाजार समितीत बसविलेल्या कॅमेऱ्यांपैकी काही कॅमेरे बंद असल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले.
बाजार समितीत दररोज शेकडो शेतकरी शेतमालाच्या लिलावासाठी येत असल्याने तेथे दैनंदिन कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. मात्र शेतकरी तसेच व्यापाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवून तसेच धमकी देऊन लूटमार करण्याचे प्रकार पुन्हा सुरू झाल्याने आता शेतकऱ्यांपाठोपाठ व्यापारीदेखील धास्तावले आहेत. बाजार समितीत सायंकाळच्या वेळी वर्दळ असते. बाजार समितीत पोलीस कर्मचारीही तैनात असतात; मात्र पोलीस ठाण्यापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या बाजार समितीत रोकड चोरीची घटना घडत असेल तर व्यापाऱ्यांनी काय करायचे, असा सवालही भयभीत व्यापाऱ्यांनी केला आहे. आगामी कालावधीत अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी बाजार समिती तसेच पंचवटी पोलिसांनी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे व्यापाऱ्यांनी बोलून दाखविले. (वार्ताहर)