बससेवेचा मुहूर्त हुकणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 23:44 IST2020-03-21T23:44:09+5:302020-03-21T23:44:45+5:30
नाशिक : महापालिकेच्या वतीने येत्या १ मेपासून शहर बस वाहतूक सुरू करण्याची तयारी सुरू असून, यापूर्वी लोकप्रतिनिधींच्या बैठकीत तसे सांगण्यात आले असले तरी त्यासाठी तयारी अपूर्ण असून, पूर्ण क्षमतेने बसदेखील दाखल झालेल्या नाहीत. अन्य अनेक सेवांची कामे अपूर्ण असल्याने बससेवेचा मुहूर्त लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. आयुक्त राधाकृष्ण गमे यांनीदेखील तसे सूतोवाच केले आहे.

बससेवेचा मुहूर्त हुकणार!
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महापालिकेच्या वतीने येत्या १ मेपासून शहर बस वाहतूक सुरू करण्याची तयारी सुरू असून, यापूर्वी लोकप्रतिनिधींच्या बैठकीत तसे सांगण्यात आले असले तरी त्यासाठी तयारी अपूर्ण असून, पूर्ण क्षमतेने बसदेखील दाखल झालेल्या नाहीत. अन्य अनेक सेवांची कामे अपूर्ण असल्याने बससेवेचा मुहूर्त लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. आयुक्त राधाकृष्ण गमे यांनीदेखील तसे सूतोवाच केले आहे.
महापालिकेने शहर बस वाहतूक सुरू करण्याचा निर्णय २०१८ मध्ये घेतला. मात्र, त्यावेळी महासभेत परिवहन समितीमार्फत या सेवेचे संचलन करण्याचा ठराव करण्यात आला. परंतु तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगून बस कंपनीचा ठराव करण्यास भाग पाडले. पहिल्या टप्प्यात चारशे बस घेताना त्यात सीएनजी आणि डिझेल बस होत्या. मात्र, फडणवीस यांनी त्यावर काट मारून डिझेलच्या बस कमी करून इलेक्ट्रीक बस वापरण्याची सूचना केली. त्यातच बससेवा पुरवठ्यासाठी निविदा मागवल्यानंतर त्याला सुरुवातीच्या काळात प्रतिसादच मिळाला नाही. इलेक्ट्रीक बससाठी तर तीन वेळा निविदा काढूनदेखील एकमेव निविदा आल्याने त्याच कंपनीला काम देण्यात आले. वाहक आणि अन्य कर्मचारी, तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी सुविधा, बसस्थानके आणि अन्य अनेक कामे होणे बाकी आहे. अनेक जागा राज्य परिवहन महामंडळाशी करार करून ताब्यात घेण्यात येणार असून, त्याबाबतदेखील कार्यवाही होणे बाकी आहे. या सर्व बाबींचा विचार केला तर पूर्वतयारी मोठ्या प्रमाणात बाकी आहे. सीएनजी बस दाखल होण्यास प्रारंभ झाला आहे.
शहरातील काही मोजक्याच मार्गांवर ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व मार्गांवर सेवा सुरू करण्यात येणार आहेत. तथापि, सर्वच कामे सध्या कार्यवाहीत असून, अवघ्या दीड महिन्यात ही कामे पूर्ण होण्याची शक्यता नसल्याने बससेवा वेळेत सुरू होण्याची शक्यता नाही. आयुक्त गमे यांनीदेखील बससेवा मेपासून सुरू होण्याची शक्यता नसल्याचे सांगितले.महापालिकेच्या सेवेसाठी इलेक्ट्रीक बस वापरण्यात येणार आहे. परंतु फक्त ५० बसेससाठीच केंद्र शासनाचे अनुदान मिळणार आहे. त्यामुळेदेखील अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.