शॉर्टसर्किटमुळे तीन एकर ऊस जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 00:52 IST2021-01-20T21:05:42+5:302021-01-21T00:52:43+5:30
सायखेडा : निफाड तालुक्यातील पिंपळस रामाचे येथे बाणगंगा नदीच्या किनाऱ्यावर असणाऱ्या शिवारात डीपीमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्याने सुमारे साडेतीन एकर ...

शॉर्टसर्किटमुळे तीन एकर ऊस जळून खाक
सायखेडा : निफाड तालुक्यातील पिंपळस रामाचे येथे बाणगंगा नदीच्या किनाऱ्यावर असणाऱ्या शिवारात डीपीमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्याने सुमारे साडेतीन एकर ऊस जळून खाक झाला. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून वीज वितरण कंपनीने याची तात्काळ दखल घेऊन पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
रेणुका दर्शन केंगे यांचा ग. नं. ६५१/१ ऊस क्षेत्र ६५ गुंठे, तर बाळासाहेब सुरवाडे ग.नं. ६५२ क्षेत्र २ एकर जळून खाक झाला. बाणगंगा नदीच्या खोऱ्यात काळी कसदार जमीन, मुबलक पाणी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊस लागवड क्षेत्र आहे. याच परिसरातून कूपनलिकाद्वारे इतर गावांतील शेतीसाठी उचल पाणी नेण्यात आले आहे.
या भागात विहीर आणि नदीच्या काठावर अनेक विद्युत पंप असल्यामुळे ताराचे जाळे पसरलेले आहे. तारा जीर्ण झाल्यामुळे खाली आल्या आहेत. शिवाय, अनेक रोहित्रांवर जुने फ्युज आणि इतर सामान असल्यामुळे अनेकदा शार्टसर्किट होते. बुधवारी अचानक उसातून धूर आणि ज्वाळा बाहेर पडू लागल्या. तेव्हा परिसरातील शेतकरी जमा झाले. मात्र, आगीची दाहकता जास्त असल्यामुळे आग आटोक्यात आणता आली नाही. ऊस आणि उसाचे पाचट लवकर पेट घेते. त्यामुळे ज्वलनशील पदार्थ जवळ असल्यामुळे आग आटोक्यात आली नाही. शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर वर्ष भर सांभाळून ठेवलेला ऊस जळून खाक झाला.
शेतकऱ्यांचे लाखो रुपये आगीत भस्मसात झाले. शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.