कॉपी पुरविणाऱ्यांची भाऊगर्दी
By Admin | Updated: March 2, 2017 01:08 IST2017-03-02T01:07:48+5:302017-03-02T01:08:04+5:30
त्र्यंबकेश्वर : येथील नूतन त्र्यंबक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये आज बारावीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी कॉप्या पुरविणाऱ्यांची भाऊगर्दी दिसून आली

कॉपी पुरविणाऱ्यांची भाऊगर्दी
त्र्यंबकेश्वर : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या नूतन त्र्यंबक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये आज बारावीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू झाली आहे. पहिला पेपर इंग्रजीचा होता. पहिल्याच दिवशी कॉप्या पुरविणाऱ्यांची भाऊगर्दी दिसून आली. तथापि, आत भरारी पथक आले होते. त्यामुळे काही काळ कॉपी पुरविणारे व कॉपीबहाद्दर यांची पंचाईत झाली होती. या नंतर मात्र परीक्षा सेंटरमध्ये सर्रास कॉप्या होत असल्याचे चित्र पहावयास मिळत होते. केंद्राबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त तर परीक्षागृहात येथे खिडक्यांमधून दुसऱ्या मजल्यावर विद्यार्थ्यांसाठी कॉप्या फेकल्या जात होत्या तसेच आवारात काही ठिकाणी कागदांचा खच पडल्याचे चित्र होते. वर्गातील पर्यवेक्षकाने विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवणे गरजेचे होते.
ब्रह्मा व्हॅली शैक्षणिक संकुलात प्रथमच बारावीचे पेपर सुरू असून, बाहेरून कॉपी देण्यास वाव नसला तरीदेखील परीक्षा दालनात पाहून लिहिण्याची मुभा असावी, असा अंदाज वाटत होता.
त्र्यंबकेश्वर महाविद्यालयाच्या आवारात कॉपी पुरविणाऱ्यांची चाहुल पोलिसाना लागताच कॉपी पुरवणाऱ्या बहाद्दरांनी पळ काढीत होते. दरम्यान, त्र्यंबकेश्वर तालुक्यात त्र्यंबकेश्वर या तालुकास्थळी १६४० विद्यार्थी परीक्षेसाठी बसले आहेत. या मुख्य केंद्रात ब्रह्मा व्हॅली अभिनव कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, हरसूल (ज्युनिअर), हरसूल (सिनिअर), खरशेत, बोरीपाडा, मूळवड, तळेगाव (अं.) अशा नऊ शाळांचा समावेश आहे. तसेच ब्रह्मा व्हॅली उपकेंद्र आहे.