गोणीतून कांदा विक्रीस आणावा
By Admin | Updated: July 25, 2016 23:53 IST2016-07-25T23:52:57+5:302016-07-25T23:53:43+5:30
मनमाड : बाजार समिती संचालकांच्या बैठकीत आवाहन

गोणीतून कांदा विक्रीस आणावा
मनमाड : यापूर्वी शेतकऱ्यांकडून वसूल केली जाणारी अडत आता व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याच्या निर्णयाविरोधात व्यापारीवर्गाने
सुरू केलेला संप मागे घेतला असल्याने शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांप्रमाणे मनमाड येथेही गोणीतून कांदा विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समिती संचालकांच्या बैठकीत करण्यात आले. सभापती डॉ. संजय सांगळे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
बाजार समित्यांनी महाराष्ट्र शासनाच्या दि. ५ जुलै २०१६ रोजी काढण्यात आलेल्या अध्यादेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शेतकऱ्यांकडून वसूल केली जाणारी अडत व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याचे ठरले होते.
सर्वत्र व्यापाऱ्यांकडून अडत वसूल करण्याच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांनी संपाचे हत्त्यार उपसले होते. चिघळलेल्या या संपावर तोडगा काढण्यासाठी व्यापारी संघाचे जिल्हाध्यक्ष सोहनलाल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांच्या बैठकीत शेतकऱ्यांकडून अडत वसूल करू नये तसेच संप मागे घेऊन लिलाव पूर्ववत सुरू करावे, असा एकमुखी निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर मनमाड बाजार समितीमध्ये संचालक व व्यापाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांनी आपला कांदा प्रतवारी करून ४५ किलोच्या गोणीतून विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले. यावेळी माजी आमदार संजय पवार, उपसभापती अशोक पवार, संचालक किशोर लहाने, राजू सांगळे यांच्यासह संचालक व व्यापारी उपस्थित
होते. (वार्ताहर)