...तर मराठा समाजाला मुंबईतही आणू शकतो - मनोज जरांगे पाटील

By धनंजय वाखारे | Published: November 22, 2023 05:37 PM2023-11-22T17:37:54+5:302023-11-22T17:38:25+5:30

सकल मराठा समाजाला मुंबईतही आणू शकतो, परंतु तशी वेळ येऊ देऊ नका, असे आवाहन मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी इगतपुरी तालुक्यातील शेणित येथील जाहीर सभेत केले.

bring Maratha community to Mumbai too says manoj Jarange Patil | ...तर मराठा समाजाला मुंबईतही आणू शकतो - मनोज जरांगे पाटील

...तर मराठा समाजाला मुंबईतही आणू शकतो - मनोज जरांगे पाटील

विक्रम पासलकर

गोंदे दुमाला (नाशिक) : मराठा आरक्षणाला सत्तेतील काही मंत्री व त्यांच्या अवतीभवती असणाऱ्या दहा पंधरा जणांच्या टोळीचा विरोध आहे. मराठा समाज व ओबीसी बांधव यांच्यातील वातावरण दूषित केले जात आहे. परंतु तुम्ही कितीही मांड्या ठोका, मराठा समाज दंड थोपटल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी २४ डिसेंबरपूर्वी दिलेला शब्द पाळल्यास कुठल्याही आंदोलनाची गरज भासणार नाही. सकल मराठा समाजाला मुंबईतही आणू शकतो, परंतु तशी वेळ येऊ देऊ नका, असे आवाहन मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी (दि.२२) इगतपुरी तालुक्यातील शेणित येथील जाहीर सभेत केले.

इगतपुरी, सिन्नर, नाशिक व त्र्यंबकेश्वर या तालुक्यातील सकल मराठा समाजातर्फे शेणित येथे आयोजित सभेला मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते. यावेळी जरांगे पाटील यांनी घणाघाती भाषण करत सांगितले, राज्यभरातील अखंड मराठा समाज जर ओबीसी प्रवर्गात आलाच तर आपली दुकाने बंद होतील आणि मराठा समाज डोइजड होईल या भीतीने अनेकांचा पोटशूळ उठला आहे. त्यासाठीच त्यांनी एका साहेबाला पुढे केले आहे. ऊठसूठ आमच्यावर खालची पातळी सोडून दूषित वातावरण निर्माण केले जात आहे. पण आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव न घेता दिला. आजपर्यंत राज्यभरात सुमारे ३२ लाख मराठ्यांच्या ओबीसी नोंदी शासकीय पातळीवर आढळून आल्या आहेत. शासनाचे हे काम प्रगतिपथावर सुरु आहे. ज्यांच्या नोंदी आढळत नाहीत त्यांनी बिथरुन जाऊ नये. आपल्यात खुळपाट घालायचा कार्यक्रम सुरु आहे. मात्र आपली एकजुट अशीच अभेद्य ठेवा, असे आवाहनही त्यांनी केले. सभेच्या पूर्वी स्वाती कदम व अन्य महिलांनी मनोगत व्यक्त केले.

जरांगेंकडून शांततेची शपथ 

या जनसभेसाठी तालुक्यातील गावांनी मोढा जाहीर केला होता. शेतकऱ्यांनी शेतीकामे बंद ठेवून सभेला हजेरी लावली. सभास्थळी शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला होता. जरांगे पाटील यांचे पुष्पवृष्टी करत जंगी स्वागत करण्यात आले. दि. १ डिसेंबरपासून राज्यभर गावोगावी साखळी उपोषण सुरु होणार आहे.

शांततेच्या माध्यमातून नागरिकांना त्रास होणार नाही व तेढ निर्माण होणार नाही अशी शपथ जरांगे पाटील यांनी यावेळी जनसभेला दिली.
इगतपुरी तालुका समाज विकास फाउंडेशन तर्फे सभास्थळी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती. ठिकठिकाणी दानशूरांनी जेवण, नाश्ता, पाणी व वैद्यकीय व्यवस्था केली होती.

Web Title: bring Maratha community to Mumbai too says manoj Jarange Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.