परदेशात नोकरी देण्याच्या आमिषाने तीन कोटींना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:39 IST2017-10-28T00:39:03+5:302017-10-28T00:39:08+5:30
परदेशात नोकरीचे आमिष दाखवून शहरातील गोविंदनगरमधील एका इसमास इंटरनेटच्या माध्यमातून संशयिताने तब्बल पावणे तीन कोटी रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ दीपक दिंगबर पाठक (५३, रा़पाटील क्लासिक, बी अपार्टमेंट, पिंपरीकर हॉस्पिटलजवळ, गोविंदनगर) असे फसवणूक झालेल्या इसमाचे नाव आहे़ विशेष म्हणजे संशयिताने बनावट ई-मेल आयडीवरून बनावट अपॉर्इंटमेंट लेटर, पेमेंट रिसीट व अॅग्रीमेंट लेटरही पाठक यांना पाठविले होते़

परदेशात नोकरी देण्याच्या आमिषाने तीन कोटींना गंडा
नाशिक : परदेशात नोकरीचे आमिष दाखवून शहरातील गोविंदनगरमधील एका इसमास इंटरनेटच्या माध्यमातून संशयिताने तब्बल पावणे तीन कोटी रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ दीपक दिंगबर पाठक (५३, रा़पाटील क्लासिक, बी अपार्टमेंट, पिंपरीकर हॉस्पिटलजवळ, गोविंदनगर) असे फसवणूक झालेल्या इसमाचे नाव आहे़ विशेष म्हणजे संशयिताने बनावट ई-मेल आयडीवरून बनावट अपॉर्इंटमेंट लेटर, पेमेंट रिसीट व अॅग्रीमेंट लेटरही पाठक यांना पाठविले होते़ सायबर पोलीस ठाण्यात दीपक पाठक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयितांनी इंटरनेटच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधला़ १६ मे ते ५ जुलै या कालावधीत पाठक यांच्या दीपक पाठक ३०८ या जीमेल अकाउंटवर विदेशात मोठ्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखविले़ या नोकरीसाठी प्रारंभी काही रक्कम आॅनलाइन पद्धतीने ट्रान्सफर करण्यास सांगितले़ त्यानुसार पाठक यांनी रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर संशयितांनी एचआर एम्परिक्स आॅटोमेशन, व्हीएफएस हाय कमिशन, एयू विसा सेंटर या व अशा प्रकारचे बनावट ई-मेल आयडीवरून पाठक यांच्या मेलवर बनावट अपॉर्इंटमेंट लेटर , पेमेंट रिसिट व अॅग्रीमेंट लेटर बनवून मेल केले़ यानंतर वेगवेगळे कारणे सांगून पाठक यांच्याकडून वेळोवेळी २ कोटी ७८ लाख १० हजार ५० रुपये आॅनलाइन पद्धतीने उकळले़ दरम्यान, कागदोपत्री पूर्ण पूर्तता तसेच पैशांची मागणी पूर्ण करूनही नोकरी न मिळाल्याने पाठक यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली़ याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटी अॅक्टन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.