पर्वणी काळात रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास
By Admin | Updated: August 30, 2015 22:38 IST2015-08-30T22:37:46+5:302015-08-30T22:38:39+5:30
वाहनधारकांनी घेतला सुट्यांचा आनंद

पर्वणी काळात रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास
दिंडोरी : कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणीला भाविक मोठ्या प्रमाणात हजेरी लावतील, या शक्यतेने विविध रस्ते बंद करून वाहतूक वळविण्यात आली होती. मात्र या वळण रस्त्यांचा उपयोग करण्यापेक्षा तीन दिवस सुट्यांचा आनंद घेणे अनेक वाहनधारकांनी पसंत केल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला .
गुजरातहून येणारी जड वाहतूक वणी, दिंडोरीमार्गे पिंपळगाव ओझरकडे वळविल्याने व भाविकांच्या वाहनांची वर्दळही कमी झाल्याने दिंडोरी-नाशिक या रस्त्यावर वाहतूक कमी होती. शहरात जड वाहनांना प्रवेश बंद केल्याने गुजरातहून सापुतारामार्गे येणाऱ्या वाहनांना वणीतून, तर वापी-बलसाडहून पेठरोडने येणाऱ्या वाहनांना उमराळे येथून वळण देत दिंडोरीमार्गे पिंपळगावकडे रवाना करण्यात आले. मात्र या वाहनांची संख्याही कमालीची घटली होती. वाहनधारकांनी वळण रस्त्यांचा वापर करण्याऐवजी रस्त्यावर वाहने थांबवलेली दिसली. औद्योगिक कंपन्यांनी तर या दिवसात वाहतूक बंदच ठेवण्याचे नियोजन केले होते. कंपन्यांची मालवाहतुकीची वाहने रस्त्यावर आलीच नाहीत. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी नियोजन केले होते; मात्र रस्त्यावर तुरळकच वाहने दिसत होती.