मनसेच्या प्रकल्पांचे भाजपाकडून ब्रॅण्डिंग
By Admin | Updated: April 30, 2017 02:14 IST2017-04-30T02:14:18+5:302017-04-30T02:14:26+5:30
नाशिक : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानांतर्गत स्थापन झालेल्या नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनला गेल्या दहा महिन्यांत सूर गवसला नाही.

मनसेच्या प्रकल्पांचे भाजपाकडून ब्रॅण्डिंग
नाशिक : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानांतर्गत स्थापन झालेल्या नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनला गेल्या दहा महिन्यांत सूर गवसला नाही. प्रकल्प सल्लागारापासून ते विविध पदांच्या नेमणुकांपर्यंतचे घोंगडे भिजत पडले आहे. त्यामुळे दहा महिन्यांत काही ठोस कामगिरी करून दाखविता आली नाही. आता स्मार्ट सिटी अभियानाच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त कंपनीमार्फत मागील पंचवार्षिकमधील मनसेच्या सत्ताकाळात राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या प्रकल्पांचे प्रदर्शन करण्याची केविलवाणी स्थिती येऊन ठेपली आहे. प्रशासनाच्या बनवेगिरीच्या या प्रयत्नाला मनसे कशाप्रकारे हाताळते, हे पाहणे आता लक्षवेधी ठरणार आहे.
स्मार्ट सिटी अभियानांतर्गत स्थापन झालेल्या कंपनीची बैठक सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि.२९) झाली. येत्या २५ जून २०१७ रोजी स्मार्ट सिटी अभियानाचा द्वितीय वर्धापनदिन साजरा केला जाणार आहे. मागील वर्षी २५ जूनला पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत स्मार्ट सिटी अभियानाचा प्रथम वर्धापनदिन साजरा करण्यात आला होता. त्यावेळी मोदी यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण नाशिकमध्येही महापालिकेच्या राजीव गांधी भवनमध्ये करण्यात आले होते. आता स्मार्ट सिटी अभियानाच्या द्विवर्षपूर्ती सोहळ्याची तयारी सुरू आहे. यावेळी पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात स्मार्ट सिटी अभियानात समाविष्ट झालेल्या शहरांकडून राबविलेल्या विविध प्रकल्पांचे सादरीकरण केले जाणार आहे. त्यानुसार, नाशिक महापालिकेच्या कंपनीमार्फत सदर प्रदर्शनात होळकर पुलाखाली साकारलेला फाऊण्टन, घनकचरा व्यवस्थापनासाठी नव्याने घेतलेल्या घंटागाड्या व खतप्रकल्पाचे नूतनीकरण, सरकारवाड्याचे नूतनीकरण, गंगापूररोडवरील बारा बंगला पंपिंग स्टेशनच्या जागेत उभारलेले बाळासाहेब ठाकरे इतिहास वस्तुसंग्रहालय, ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्क, उड्डाणपुलाखालील सौंदर्यीकरण व नेहरू वनोद्यानात साकारलेले बॉटनिकल गार्डन यांचा समावेश आहे. यामध्ये सरकारवाड्याचे नूतनीकरण वगळता अन्य सर्व प्रकल्प हे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून त्यांच्या मनसेच्या सत्ताकाळात साकार झालेले आहेत.
मात्र, तेच प्रकल्प स्मार्ट सिटीअंतर्गत झाले असल्याचा केविलवाणा प्रयत्न मनपा प्रशासनाकडून दाखविला जाणार आहे. मनसे या प्रकाराला काय प्रतिसाद देते, हे पाहणे लक्षवेधी ठरणार
आहे. (प्रतिनिधी)