अंध बांधवांसाठी ब्रेल लायब्ररी
By Admin | Updated: February 27, 2017 00:19 IST2017-02-27T00:19:17+5:302017-02-27T00:19:34+5:30
भाग्यश्री मुळे : नाशिक ते येतात... आपल्या आवडीची पुस्तके घेतात आणि तन्मयतेने वाचतात... नाशिकमध्ये आॅडिओ लायब्ररी पाठोपाठ ब्रेल लिपीच्या खास लायब्ररीने हे शक्य झाले आहे.

अंध बांधवांसाठी ब्रेल लायब्ररी
भाग्यश्री मुळे : नाशिक
ते येतात... आपल्या आवडीची पुस्तके घेतात आणि तन्मयतेने वाचतात...वाचनाचा आंनद घेताना त्यांच्या चेहेऱ्यावरील भाव समाधानाचे असतात. अर्थात, त्या मागे असते जिज्ञासा... अंध असतानाही वाचनातून ज्ञानवर्धनाच्या त्यांच्या जिद्दीला सलाम करावासा वाटतो! नाशिकमध्ये आॅडिओ लायब्ररी पाठोपाठ ब्रेल लिपीच्या खास लायब्ररीने हे शक्य झाले आहे.
शिक्षण आणि ज्ञान हे शारीरिक मर्यादांच्या पलीकडे जाऊन संधी निर्माण करण्यासाठी उज्ज्वल भविष्याची चावी आहे. अंधबांधवांना या चावीच्या माध्यमातून ज्ञानाचा खजिना मिळावा यासाठी राज्यभर ब्रेल लायब्ररी सुरुकरण्यात आली आहे. याचे पहिले पाऊल सातपूरच्या नॅब संकुल येथे नॅब महाराष्ट्र-अॅम्वे अॅपॉर्च्युनिटी फाउंडेशन ब्रेल लायब्ररीचे नुकतेच उद््घाटन करण्यात आले. ब्रेल लिपीतील शैक्षणिक पुस्तके, फिक्शन, सेल्फ-हेल्प, जनरल नॉलेज आदि प्रकारांतील एक हजार पुस्तके आणि नियतकालिक यांची ब्रेल आवृत्तीतील पुस्तके व ६०० हून अधिक प्रकारची आॅडिओ सीडी प्रकारातली पुस्तके या लायब्ररीत उपलब्ध करून देण्यात आली आहे. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइन्डच्या राज्यातील संस्थांसाठी अशा प्रकारच्या ३१ लायब्ररी तयार करण्याचा निर्धार केला असून, येत्या दोन ते तीन महिन्यांत या लायब्ररींचे उद््घाटन करण्यात येणार आहे.
नाशिक जिल्ह्यात २० हजार, लातूर जिल्ह्यात १० हजार, अमरावती जिल्ह्यात २० हजार, सोलापूर जिल्ह्यात ३३ हजार, कोल्हापूर जिल्ह्यात १७ हजार अंध बांधव आहेत. या व्यक्तिंपर्यंत वाचन संस्कृती पोहचविण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी त्यांना एका कंपनीच्या उत्तरादायित्व निधीतून सुमारे साडेसोळा लाख रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे.
नॅबच्या मदतीने येथे ब्रेल आॅडिओ हायब्रीड लायब्ररी स्थापन करण्यात आली आहे. या लायब्ररीमुळे तळागाळातील अंध व्यक्तिंना सर्वप्रकारच्या साहित्यांचा, शास्त्रांच्या पुस्तकांचा लाभ घेता येणार आहे. या लायब्ररीत वाचनाचा आनंद मोफतपणे घेता येणार असून, अंध बांधवांबरोबरच बहुविकलांग व्यक्तिंनाही ‘हावभाव किंवा खुणांच्या’ भाषेतून साहित्याचा आस्वाद घेता येणार आहे. त्यासाठी येथे विशेष शिक्षकही कार्यरत आहेत. क्रमिक आणि अवांतर पुस्तकांबरोबरच स्पर्धा परीक्षांची पुस्तकेही लायब्ररीत उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.