त्र्यंबकमध्ये ब्रह्मगिरी परिक्रमेस प्रारंभ
By Admin | Updated: August 30, 2015 22:52 IST2015-08-30T22:51:01+5:302015-08-30T22:52:14+5:30
त्र्यंबकमध्ये ब्रह्मगिरी परिक्रमेस प्रारंभ

त्र्यंबकमध्ये ब्रह्मगिरी परिक्रमेस प्रारंभ
त्र्यंबकेश्वर : सिंहस्थ पर्वकाळातील तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी राज्यभरातील विविध ठिकाणाहून हजारो भाविक दाखल झाले आहेत. सिंहस्थ पर्वणीप्रमाणे परिक्रमेसाठीही सर्व प्रकारच्या खासगी वाहनांना प्रत्यक्ष शहरात येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
दर श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी फेरी मारण्यासाठी शिवभक्त येतात. तिसऱ्या श्रावणी सोमवारी भाविकांची मोठी गर्दी होते. यंदा तिसऱ्या श्रावणी सोमवारपूर्वी दोन दिवस अगोदर सिंहस्थ कुंभमेळ्याची पहिली पर्वणी पार पडली. त्यानंतर रविवारी दुपारपासूनच हजारोंच्या संख्येने भाविक त्र्यंबकनगरीत दाखल होत आहेत.
दरम्यान, त्र्यंबकमधील हॉटेल, लॉजेस सज्ज झाली असून, ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. मंदिर व परिसरात अन्य प्रसाद व इतर पूजा साहित्य, खेळणी व भेटवस्तूंची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली आहेत. तिसऱ्या सोमवारी त्र्यंबकमध्ये पाऊस असल्याचा त्र्यंबकवासीयांचा अनुभव आहे; परंतु रविवारी मात्र शहरात पावसाने विश्रांती घेतली होती. रविवारी मध्यरात्रीपासून बम बम भोलेच्या गजरात भाविकांनी फेरीस प्रारंभ केला आहे.