शिक्षण मंडळ प्रशासनाधिकारी दुहेरी चौकशीच्या फेऱ्यात
By Admin | Updated: February 12, 2015 00:49 IST2015-02-12T00:31:18+5:302015-02-12T00:49:05+5:30
उपसंचालकांमार्फत चौकशी : पालिकेमार्फत चौकशी अद्याप सुरूच

शिक्षण मंडळ प्रशासनाधिकारी दुहेरी चौकशीच्या फेऱ्यात
नाशिक : मनपा शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारी श्रीमती किरण कुंवर यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध अनेक तक्रारी गेल्यानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक सर्जेराव जाधव यांनी श्रीमती कुंवर यांची उपसंचालकांमार्फत चौकशी करण्याचे आदेश काढले असून, अगोदरच पालिका प्रशासनामार्फत सुरू असलेल्या चौकशीमुळे कुंवर या आता दुहेरी चौकशीच्या फेऱ्यात सापडल्या आहेत.
मनपा शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारी श्रीमती किरण कुंवर यांच्या गैरवर्तणुकीबाबत शिक्षक संघटनांसह अनेक शिक्षकांनी महापालिका आयुक्तांसह पदाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. त्यानुसार डिसेंबर व जानेवारीत झालेल्या महासभांमध्ये विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर यांनी श्रीमती कुंवर यांच्या एकूणच कारभाराचे दर्शन विविध प्रकरणांद्वारे सभागृहाला घडविले होते. त्यानुसार आयुक्तांनी प्रशासनाधिकारी कुंवर यांची चौकशी करण्यासाठी प्रशासन उपआयुक्त विजय पगार यांची नियुक्ती केली असून, त्यांच्यामार्फत चौकशीचे काम अंतिम टप्प्यात आहे. एकीकडे पालिका प्रशासनामार्फत चौकशी सुरू असतानाच आता विरोधीपक्ष नेत्यांच्या तक्रारीवरून शिक्षण संचालकांनी श्रीमती कुंवर यांची उपसंचालकांमार्फत चौकशीचे आदेश दिले असून, उपसंचालकांनी सदर चौकशी अहवाल आयुक्तांना सादर करण्याची सूचना केली आहे. बडगुजर यांनी शिक्षण संचालकांना दिलेल्या निवेदनात शिक्षण मंडळातील गणवेश खरेदी प्रकरण, बेकायदेशीर शिक्षक भरती, तसेच सहा महिन्यांपासून प्रलंबित असलेले १६ शिक्षकांचे पगार, मुख्याध्यापक सौ. खांडेकर यांचे कारणे दाखवा नोटीस न बजावता केलेले निलंबन, उर्दू शिक्षकांना हजर करून न घेणे आदि तक्रारींचा ऊहापोह केलेला आहे.
दरम्यान, पालिका प्रशासनामार्फत कुंवर यांची चौकशी झाली असून, आयुक्त विदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर त्यांच्यापुढे चौकशी अहवाल ठेवला जाणार असल्याचे चौकशी अधिकारी विजय पगार यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)