‘डीजे लेझर शो’मुळे डोळ्यांत रक्त! मिरवणुकीनंतर तरुणांच्या नेत्रपटलावर भाजल्यासारख्या जखमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 08:07 IST2023-10-02T08:06:55+5:302023-10-02T08:07:13+5:30
शहरात डीजे आणि लेझर शोच्या गजरात उत्साही युवकांनी नाचत, थिरकत बाप्पाला निरोप दिला.

‘डीजे लेझर शो’मुळे डोळ्यांत रक्त! मिरवणुकीनंतर तरुणांच्या नेत्रपटलावर भाजल्यासारख्या जखमा
नाशिक : शहरात डीजे आणि लेझर शोच्या गजरात उत्साही युवकांनी नाचत, थिरकत बाप्पाला निरोप दिला. मात्र, दुसऱ्या दिवसापासूनच अनेक नेत्रतज्ज्ञांकडे नेत्ररुग्ण वाढू लागले. विशीतले तरुण अचानक वाढले. प्राथमिक तपासणीत त्यांची नजर खूपच कमी झाल्याचे दिसून आले. नेत्रपटलावर खूप रक्त साचून भाजल्यासारख्या जखमा आढळल्याच्या अनेक घटना नेत्ररोग तज्ज्ञांच्या निदर्शनास आल्या आहेत.
डॉक्टरांकडे तक्रारी घेऊन आलेल्या अनेकांनी मिरवणुकीत नाचत डीजेवर लेझर शो बघितल्याचे सांगितले. लेझर शोचा लेझर बर्न रेटिनावर असल्याचे बहुतांश घटनांमध्ये निदान झाले.
भविष्यात लेझर त्वरित थांबविण्याची मागणी
ग्रीन लेझरची फ्रिक्वेन्सी खूप जास्त होती. जे युवक त्या लेझरच्या फ्रिक्वेन्सीच्या फोकल लेंग्थवर आले किंवा त्यांचे नेत्रपटल आले, त्यांच्याबाबतच हा प्रकार घडला. लहानपणी भिंग घेऊन ज्याप्रमाणे उन्हात कागद पेटवायचो तसाच प्रकार या लेझर बर्नने तरुणाईच्या डोळ्यांवर केला होता.
विसर्जनासाठी गेलेले तीन युवक बुडाले
सावली (जि. चंद्रपूर) : सार्वजनिक युवा गणेश मंडळाच्या विसर्जनाच्या दरम्यान असोलामेंढा तलावाच्या कालव्यात तिघे जण बुडाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. बुडालेल्यांमध्ये दोन सख्ख्या भावंडांचा समावेश आहे. निकेश हरिभाऊ गुंडावार (३१), संदीप हरिभाऊ गुंडावार (२७) व गुरुदास दिवाकर मोहुर्ले (३३) अशी बुडालेल्यांची नावे आहेत. यातील निकेश व गुरुदास यांचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला आहे. निकेश व संदीप हे दोघे बंधू काही महिन्यांपूर्वी सावली शहरात आले व त्यांनी येथे रसवंतीचा व्यवसाय थाटला. व्यवसायात चांगलाच जम बसला असताना ही घटना घडली.