काळविटाची शिकार करणाऱ्यास कोठडी
By Admin | Updated: June 12, 2017 00:47 IST2017-06-12T00:47:11+5:302017-06-12T00:47:30+5:30
ममदापूर संवर्धन : उर्वरित आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे पथक

काळविटाची शिकार करणाऱ्यास कोठडी
लोकमत न्यूज नेटवर्क
ममदापूर : काळविटाची शिकार करणाऱ्या मालेगाव येथील दस्तगीर मोहम्मद हारून याला १६ जूनपर्यंत वनविभागाची कोठडी सुनावण्यात आली आहे. चार आरोपींना अटक करण्यासाठी तसेच पुढील तपास करण्यासाठी पोलीस आणि वन अधिकाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले असून, लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे पोलीस प्रशासनाने सांगितले.
शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास मालेगावच्या पाच शिकाऱ्यांनी ममदापूर संवर्धन राखीव अंतर्गत येणाऱ्या कोळम येथील जंगलात एका काळविटाची गोळ्या झाडून हत्या केली. नंतर हरीण गाडीमध्ये टाकण्यासाठी उचलताना राजापूर येथील संतोष चव्हाण, कोळम येथील राजेंद्र आवारे व नाना चव्हाण यांनी पाहिले व स्वत: जिवाची पर्वा न करता बंदुकधारी शिकाऱ्याशी दोन हात करत दस्तगीर मोहम्मद या एका शिकाऱ्याला गाडीच्या खाली ओढले. दरम्यान, उर्वरित चौघे शिकारी पळून गेले.
यापूर्वी २७ जुलै २००९ रोजी मालेगाव येथील चार शिकाऱ्यांनी दोन हरिणांची रेंडाळा भागात शिकार करून पलायन करतानाच खरवंडी येथील लोकांनी पकडून यथेच्छ चोप दिला होता. तसेच शिकाऱ्यांची गाडीदेखील पेटवून दिली होती, तेव्हाची अर्धवट जळालेली गाडी अद्यापही राजापूर येथील फॉरेस्ट कॉलनीत आहे. बाकी स्थानिक लोकांनी जीव धोक्यात घालून पकडलेल्या आरोपींचे काय झाले? या आरोपींना शिक्षा झाली की ताबडतोब सुटका केली. याविषयी कोणतीही माहिती वनविभागाने दिली नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आहे. या भागात वनविभागाचे पगारी कर्मचारी असतानाही राजापूर, ममदापूर, खरवंडी, देवदरी, रहाडी, कोळम, भारम या भागातील शेतकरी हरिणांची जिवापाड देखभाल करतात. उभ्या पिकांची नासाडी केली तरी शेतकरी या हरिणांचे रक्षण करतात, सन २००९ मधील काळविटाची शिकार झालेल्या घटनेतील आरोपी व त्यांच्यावरील कारवाई गुलदस्त्यात आहे. मध्यंतरी हरिणांची शिकार करण्याकरिता मालेगाव परिसरातून टोळकी रात्रीच्या वेळेला येत असल्याची चर्चा या वनविभागाच्या परिसरात होती.
अनेकदा गोळीबारीचे आवाजही ऐकल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. तब्बल आठ वर्षांनंतर पुन्हा एकदा ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून शिकाऱ्याशी दोन हात केले; मात्र वनविभागाचे पगारी अधिकारी व कर्मचारी हे नेमके करतात तरी काय ? हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
दिवसा जर हरिणांची शिकार होते आहे तर रात्री काय घडत असेल अशा चर्चांना उधाण आले आहे. आता या चार आरोपींना किती दिवसात पकडण्यात पोलिसांना यश येते आणि आरोपपत्र दाखल होऊन आरोपींना कधी शिक्षा होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.