येवल्याच्या जरतारी पैठणीला कोरोनाची काळी किनार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 00:05 IST2020-05-19T22:50:26+5:302020-05-20T00:05:22+5:30
कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्वच क्षेत्र बाधित झाले आहे. कोरोना प्रतिबंधासाठी शासनाने लॉकडाउन व संचारबंदी लागू केली. यात सर्वच छोटे-मोठे उद्योग लॉक झालेत. जगभर जाणाऱ्या येवल्याच्या पैठणीलाही या टाळेबंदीचा मोठा फटका बसला आहे. ऐन लग्नसराई हंगामात कोट्यवधींचा व्यवसाय बुडाला. त्याबरोबरच पैठणी व्यवसायावर रोजीरोटी असणाºया हातमाग, विणकर कारागिरांवर रोजगार बुडाल्याने उपासमारीची वेळ आली आहे.

येवल्याच्या जरतारी पैठणीला कोरोनाची काळी किनार
योगेंद्र वाघ । लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्वच क्षेत्र बाधित झाले आहे. कोरोना प्रतिबंधासाठी शासनाने लॉकडाउन व संचारबंदी लागू केली. यात सर्वच छोटे-मोठे उद्योग लॉक झालेत. जगभर जाणाऱ्या येवल्याच्या पैठणीलाही या टाळेबंदीचा मोठा फटका बसला आहे. ऐन लग्नसराई हंगामात कोट्यवधींचा व्यवसाय बुडाला. त्याबरोबरच पैठणी व्यवसायावर रोजीरोटी असणाºया हातमाग, विणकर कारागिरांवर रोजगार बुडाल्याने उपासमारीची वेळ आली आहे.
येवला शहरासह तालुक्यात सुमारे नऊ हजार हातमाग आहेत. या हातमागावर काम करणारे तसेच रंगणी, साननी, पदर काढणारे, उकलणारे असे सुमारे तीस हजार विणकर, कारागीर आहेत. लग्नाच्या सीझनमध्ये सुमारे शंभर-सव्वाशे कोटी रुपयांची उलाढाल होत असते. कोरोनाने बाजारपेठा, लग्न सोहळे-समारंभ ठप्प झाल्याने विक्रे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्याबरोबरच विणकर-कारागिरांचेही वर्षाचे आर्थिक गणित बिघडले आहे. पैठणी उद्योगाबरोबरच विणकर, कारागिरांसाठी शासानाने तातडीने विशेष उपाययोजनेत आर्थिक मदत देऊन दिलासा देण्याची गरज निर्माण झाली आहे.
येवल्याची पैठणी जगभर प्रसिद्ध आहे. शहर परिसरातील सुमारे चाळीस टक्के कुटुंबं पैठणीनिर्मिती व्यवसायात आहे. सद्य:स्थितीत शहर व तालुका परिसरात सुमारे चारशेपेक्षा अधिक पैठणी विक्रीची दुकाने आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाउन व संचारबंदी लागू झाल्याने येवल्यातील पैठणी व्यवसायही लॉक झाला. राज्यबंदी, जिल्हाबंदी, गावबंदी-सीमाबंदीने ग्राहक नाही. ऐन लग्नसराईत लॉकडाउनने विक्रेत्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. काही विणकर-कारागिरांनी तर कर्ज घेऊन व्यवसाय उभा केला होता. कोरोनाने त्यांच्यावरील कर्जाचा भार अधिकच वाढवला असून, आता कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न उभा ठाकला आहे. तर कारागीर बेरोजगार झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.