भाजपाच्या बोलकर विजयी
By Admin | Updated: May 20, 2017 01:58 IST2017-05-20T01:58:44+5:302017-05-20T01:58:52+5:30
सातपूर : सातपूर प्रभाग सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या माधुरी बोलकर यांनी दोन मतांची आघाडी घेत विजय संपादन केला.

भाजपाच्या बोलकर विजयी
लोकमत न्यूज नेटवर्क
सातपूर : सातपूर प्रभाग सभापतिपदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे मनसेच्या दोघा नगरसेवकांनी भाजपाच्या उमेदवाराला मतदान केल्याने भाजपाच्या माधुरी बोलकर यांनी दोन मतांची आघाडी घेत विजय संपादन केला. प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार संतोष गायकवाड यांचा पराभव झाला. २५ वर्षांनंतर प्रथमच सातपूरमध्ये भाजपाचा प्रभाग सभापती विराजमान होत आहे.
सातपूर विभागीय कार्यालयात शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता प्रभाग समिती सभापतिपदाची निवडणूक अपर आयुक्त जोतिबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. भाजपाच्या माधुरी बोलकर तर शिवसेनेचे संतोष गायकवाड हे दोघे उमेदवार होते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी माघारीसाठी १५ मिनिटांचा अवधी दिला होता. यावेळेत कोणीही माघार न घेतल्याने सरळसरळ मतदान घेण्यात आले. हात उंचावून घेण्यात आलेल्या मतदानात बोलकर यांच्या बाजूने मनसेचे सलीम शेख, योगेश शेवरे तर भाजपाचे दिनकर पाटील, वर्षा भालेराव, रवींद्र धिवरे, हेमलता कांडेकर, शशिकांत जाधव, सुदाम नागरे, पल्लवी पाटील, अलका अहिरे आणि स्वत: माधुरी बोलकर यांनी हात उंचावून मतदान केल्याने बोलकर यांना ११ मते मिळाल्याने त्यांची निवड घोषित करण्यात आली. शिवसेनेचे संतोष गायकवाड यांना विलास शिंदे, नयना गांगुर्डे, राधा बेंडकोळी, दिलीप दातीर, हर्षदा गायकर, भागवत आरोटे, सीमा निगळ, रिपाइंच्या दीक्षा लोंढे आदींनी मतदान केल्याने गायकवाड यांना ९ मते मिळालीत. मनसेच्या पाठिंब्याने भाजपाने सातपूरला प्रभाग सभापतिपद काबीज केले आहे.
यावेळी आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, स्थायी सभापती शिवाजी गांगुर्डे, संभाजी मोरु स्कर, विजय साने, गणेश बोलकर, स्वप्निल पाटील, दिनकर कांडेकर, महेश हिरे, कैलास अहिरे, रामहरी संभेराव, संजय राऊत, रवींद्र उगले आदींसह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपा नेत्यांनी नवनिर्वाचित प्रभाग सभापती माधुरी बोलकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला.