संघटनात्मक निवडणुकांआडून भाजपची मध्यावधीची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 00:27 IST2019-11-14T00:26:32+5:302019-11-14T00:27:06+5:30
राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच वाढला असतानाच भाजपने संघटनात्मक निवडणुकीच्या नावाखाली सार्वत्रिक निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. नाशिकमध्ये संघटनेच्या निवडणुकांसाठी मंडल स्तरावर आणि अन्य बैठका घेतल्या जात असतानाच कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना केल्या जात आहेत.

संघटनात्मक निवडणुकांआडून भाजपची मध्यावधीची तयारी
नाशिक : राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच वाढला असतानाच भाजपने संघटनात्मक निवडणुकीच्या नावाखाली सार्वत्रिक निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. नाशिकमध्ये संघटनेच्या निवडणुकांसाठी मंडल स्तरावर आणि अन्य बैठका घेतल्या जात असतानाच कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना केल्या जात आहेत.
विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका शिवसेना भाजपने युती म्हणून लढविल्या मात्र त्याचवेळी उभय पक्षांत खदखद दिसून येत होते. भाजपने उमेदवारी नाकारलेल्या माजी आमदाराला भेटणे आणि त्याला नंतर पक्षात प्रवेश देणे त्यामागे संजय राऊतच होते. परंतु त्यानंतर नाशिक पश्चिममध्येदेखील शिवसेनेने बंडखोर उमेदवाराला पुरस्कृत केले आणि नंतर रसद पुरवली होती.
राज्यात सत्ता येण्याची चिन्हे दिसत असतानाच कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपदावरून घोडे आडले. आता तर शिवसेना आणि कॉँग्रेस आघाडी यांच्यात सत्ता स्थापनेच्या चर्चा सुरू आहेत. त्यात काय होईल हे अद्याप स्पष्ट नसले तरी विधानसभा निवडणुका पुन्हा होण्याची शक्यता आहे. भाजपने त्यादृष्टीने तयारी आरंभली आहे.
उद्दिष्टपूर्तीचे आवाहन
राज्यात सध्या उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेची मागणी कशी अव्यवहार्य होती आणि भाजपने काय भूमिका घेतली, याबाबत बैठकीत कार्यकर्त्यांना अवगत केले जात आहे. गेल्यावेळी पक्षाने नाशिक शहरात तीन लाख सभासद केले होते. त्यानंतर यंदा पंचवीस टक्के अधिक वृद्धी अपेक्षित असून, त्यादृष्टीने कुठल्याही परिस्थितीत उद्दिष्टपूर्ती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दर तीन वर्षांनी भाजपच्या संघटनात्मक निवडणुका होतात. त्यानिमित्ताने सभासद नोंदणी आणि अन्य कामे होत असली तरी यंदा मध्यावधीचा विचार करून भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. वार्ड समित्या आणि मंडलांच्या बैठकांमध्ये यासंदर्भात चर्चा सुरू केल्या आहेत. मध्यावधी निवडणुका कधीही लागू शकतात. त्यामुळे सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.