Maharashtra Election 2019 : उत्तर महाराष्ट्रात भाजप-राष्ट्रवादीचा सामना

By किरण अग्रवाल | Published: October 15, 2019 06:14 AM2019-10-15T06:14:11+5:302019-10-15T15:51:38+5:30

नाशिक जिल्ह्यात युतीला बंडखोरी भोवणार : नगर जिल्ह्यात नेत्यांचा कस लागणार

BJP-NCP fight North Maharashtra | Maharashtra Election 2019 : उत्तर महाराष्ट्रात भाजप-राष्ट्रवादीचा सामना

Maharashtra Election 2019 : उत्तर महाराष्ट्रात भाजप-राष्ट्रवादीचा सामना

Next

किरण अग्रवाल 
नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर जिल्ह्यात यंदा ‘युती’ व ‘आघाडी’ अंतर्गत अधिक लढती भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होऊ घातल्या आहेत. पक्षांतराच्या वावटळीचा फटका बसूनही अनेक ठिकाणी ‘आघाडी’ दमदारपणे निवडणुकीला सामोरे जाताना दिसत आहे. विशेषत: शरद पवार यांचे नातू रोहित पवार व भाजपचे मंत्री राम शिंदे यांच्यातील लढत लक्षवेधी ठरली असून, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, भाजपमध्ये गेलेले राधाकृष्ण विखे पाटील व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.


सद्यस्थितीत नाशिक व नगर जिल्ह्यातील एकूण २७ पैकी १४ जागा ‘युती’कडे, तर १२ ‘आघाडी’कडे आहेत. यातही ‘युती’ अंतर्गत सर्वाधिक नऊ जागा भाजपने राखलेल्या असून, ‘आघाडी’त ७ जागा राष्ट्रवादीकडे आहेत. या अर्थाने म्हणजे, अंकगणिताने भाजप व राष्ट्रवादीचेच वर्चस्व असताना पक्षांतरामळे यंदा ‘युती’त अधिकची भर पडून गेली आहे.
राज्याचे विरोधी पक्ष नेते राहिलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड भाजपत, तर काँग्रेस आमदार भाऊसाहेब कांबळे व निर्मला गावित शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यामुळे ‘युती’मध्ये भाजपतर्फे लढविल्या जाणाऱ्या जागांचा टक्का वाढून गेला आहे. नगर जिल्ह्यात भाजप शिवसेनेपेक्षा दुप्पट (८) जागा लढवत आहे. दुसरीकडे ‘आघाडी’मध्ये दोन्ही जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस तब्बल १८ जागा लढत असून, काँग्रेसच्या वाट्याला अवघ्या ८ जागा आल्या आहेत. त्यामुळे भाजप-राष्ट्रवादीतच अधिक सामने होणार आहेत.


भुजबळ यांची वाट अवघड नाही, पण खडतर
येवला येथून चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जात असलेल्या भुजबळ यांचा भर त्यांनी केलेल्या विकासकामांवर असल्याने त्यांची वाट अवघड नसली तरी, सरळ लढतीमुळे खडतर ठरलेली दिसत आहे. जनता पाठीशी पण बहुसंख्य भूमिपुत्र नेते विरोधात असा तेथील सामना आहे.
विखे यांच्या नेतृत्वाचा
कस लागणार

नगर जिल्ह्यात काँगे्रसला सोडून भाजपत आलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांचा खरा कस लागणार आहे. या जिल्ह्यात भाजप आठ जागांवर लढत असून, राष्ट्रवादी सोबतच त्यांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी राहिलेले बाळासाहेब थोरात यांच्याशी विखेंना टक्कर घ्यावी लागत आहे.
बंडखोरांचा ताप
नगर जिल्ह्यात युतीमधील बंड शमविण्यात नेत्यांना यश आले असले तरी, नाशिक जिल्ह्यात काही जागांवर युतीच्या उमेदवारांची अडचण निर्माण झालेली आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते विलास शिंदे यांनी बंड पुकारले आहे. नांदगावमध्ये पालकमंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय म्हणवले जाणारे रत्नाकर पवार यांनी शिवसेना उमेदवाराविरोधात बंडखोरी केली आहे. इगतपुरीत काँग्रेसच्या विद्यमान आमदारास शिवसेनेने उमेदवारी दिल्याने भाजप-सेनेच्या नाराज पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस उमेदवाराच्या पाठीशी बळ उभे केले आहे. त्यामुळे युतीला बंडखोरांचा ताप भोवण्याची शक्यता आहे.
थोरात यांची प्रतिष्ठा पणाला
काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या नगर जिल्ह्यात काँग्रेस १२ पैकी केवळ तीनच जागांवर लढत देत आहे. त्यात एक थोरातांचा संगमनेर, शिर्डी व श्रीरामपूर असे तीन मतदारसंघ आहेत. शिर्डीत काँग्रेसचा मुकाबला विखे यांचेशी आहे. तेथे कितपत यश मिळेल ही शंका आहे. संगमनेर, श्रीरामपूर येथेच संधी आहे. थोरात संपर्क नेते राहिलेल्या नाशिक जिल्ह्यात मालेगाव (मध्य) ची जागा जनता दलाच्या निहाल अहमद यांच्यानंतर काँग्रेस राखत आली आहे; पण यंदा तेथे एमआयएमचे कडवे आव्हान आहे. नाशकात तर काँग्रेसला घोषित केलेली उमेदवारी ऐनवेळी बदलण्याची वेळ आली, तर इगतपुरीत काँग्रेसच्या विद्यमान आमदारांनी शिवबंधन हाती बांधल्याने तेथील जागेसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवार उसनवार घ्यावा लागला, यावरून काँग्रेसची नादारी स्पष्ट व्हावी.


नगर जिल्ह्यात दुरंगी लढती
अहमदनगर जिल्ह्यातील पाच मतदारसंघांत शिवसेना-भाजपला बंडखोरी शमविण्यात यश आले आहे. १२ पैकी ११ ठिकाणी दुरंगी लढत असून, कोपरगाव मतदारसंघात मात्र चौरंगी सामना पहायला मिळणार आहे. तिथे भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांच्याविरुद्ध भाजपचे नगराध्यक्ष विजय वहाडणे अपक्ष मैदानात आहेत, तर राष्ट्रवादीच्या आशुतोष काळे यांच्याविरु द्ध काँग्रेसचे राजेश परजणे (सुजय विखे यांचे मामा) मैदानात आहेत. नेवाशात माजी आमदार शंकरराव गडाख यांना राष्टÑवादीने पाठिंबा दिला आहे. उसाचा व सिंचनाचा प्रश्न महत्त्वाचा ठरणार असून, आतापर्यंत झालेल्या प्रचार सभांमध्ये स्थानिक वगळता अन्य मुद्द्यांवरच चर्चा झाल्याने मतदारही संभ्रमातच असल्याचे दिसते. त्यामुळे शेवटच्या चरणात प्रचार कोणत्या मुद्द्यांवर पोहोचतो हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पवारांचे नातू रिंगणात
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघातून शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांचा सामना भाजपचे मंत्री प्रा. राम शिंदे यांच्याशी होत आहे. लोकसभा निवडणुकीत मावळमधून पार्थ पवार यांना पराभव पाहावा लागल्यामुळे रोहित यांच्यासाठी सारे बळ एकवटून राष्ट्रवादी कामाला जुंपल्याने काट्याची लढत होत आहे.
मनसे फॅक्टर
नाशिक जिल्ह्यात मनसेने सहा जागी उमेदवार उभे केल्याने पूर्वलक्षी प्रभावाचा विचार करता मनसे फॅक्टर पुन्हा चर्चेत येऊन गेला आहे. नाशिक पूर्वमधून राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी मनसेने घोषित उमेदवारी मागे घेतली आहे. नाशिक मध्यमधून मनसेचे माजी आमदार नितीन भोसले लढत असले तरी, अचानक मिळालेल्या उमेदवारीमुळे इंजिनच्या गतीने ते धावताना दिसत नाहीत. मनेसेपेक्षा अधिक जागांवर वंचित बहुजन आघाडी रिंगणात आहे; पण अपरिचित चेहºयांमुळे त्यांचा प्रभाव दिसून येत नाही. माकप नाशिक पश्चिम व कळवणच्या जागांवर लढत आहे; परंतु यंदा आहे ती जागाही राष्ट्रवादीच्या मातब्बर उमेदवारामुळे अडचणीत सापडल्याचे दिसत आहे.

Web Title: BJP-NCP fight North Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.