सुरगाणा-पेठला रेशनिंगचे ‘बायोमेट्रिक’
By Admin | Updated: February 24, 2015 02:01 IST2015-02-24T02:00:08+5:302015-02-24T02:01:31+5:30
सुरगाणा-पेठला रेशनिंगचे ‘बायोमेट्रिक’

सुरगाणा-पेठला रेशनिंगचे ‘बायोमेट्रिक’
नाशिक : सुरगाणा येथील शासकीय धान्य गुदामातील सुमारे सव्वापाच कोटी रुपये किमतीच्या रेशन धान्याच्या अपहार प्रकरणाचा धडा घेत, प्रायोगिक तत्त्वावर पेठ व सुरगाणा या दोन तालुक्यांत सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत वाटप करावयाच्या धान्यासाठी ‘बायोमेट्रिक’ प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी घेतला असून, त्यासाठीची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. या प्रणालीमुळे खऱ्या लाभार्थ्यांची शासन दप्तरी नोंद होण्याबरोबरच, त्याच व्यक्तीला शासन योजनेचा लाभ देणे अधिक सुलभ होईलच; परंतु काळाबाजार व बोगस शिधापत्रिकाधारकांचा शोध घेणेही सहज शक्य होणार आहे. त्यामुळे ज्या ठिकाणाहून गैरव्यवहाराला प्रारंभ झाला त्या सुरगाणा व पेठ तालुक्यांपासूनच त्याची सुरुवात करण्याचे ठरविण्यात आले आहे. या साऱ्या प्रणालीसाठी सुमारे ५० लाख रुपये खर्च अपेक्षित असून, जिल्हा नियोजन मंडळाकडून तत्काळ सदरचा निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना कुशवाह यांनी दिल्या आहेत. सुरगाणा तालुक्यात १८८ रेशन दुकाने असून, अंत्योदय, बीपीएल, एपीएल असे सर्व मिळून २७ हजार ७२७ शिधापत्रिकाधारक, तर एक लाख ६२ हजार ३५७ लोकसंख्या आहे. पेठ तालुक्यात १३० रेशन दुकाने व १८ हजार ५०५ शिधापत्रिकाधारक असून, लोकसंख्या ९१ हजार ४६० इतकी आहे. या प्रणालीसाठी प्रत्येक शिधापत्रिकाधारकाच्या कुटुंबातील दोन व्यक्तींच्या अंगठ्याचे ठसे घेण्यात येणार असून, ज्या व्यक्तींचे ठसे घेतले जातील त्यांनाच रेशनमधून धान्य दिले जाणार आहे. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांचे ठसे घेतानाच खऱ्या लाभार्थ्यांची ओळख पटण्यास मदत होणार असून, ज्यांचे ठसे घेतले जाणार नाही किंवा जे ठसे द्यायला येणार नाहीत ते शिधापत्रिकाधारक यात नसल्याचे समजले जाणार आहे.