नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात ठेकेदारांच्या बिलांचा घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 16:09 IST2017-12-12T16:07:17+5:302017-12-12T16:09:10+5:30

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून आदिवासी विकास विभाग व इतर शासकीय विभागांची विकास कामे करून घेतली जातात. संपुर्णत: बांधकाम खात्याच्या नियंत्रणाखाली ठेकेदारांकरवी करून घेतल्या जाणा-या कामांचे कार्यारंभ आदेश दिल्यानंतर सुरू होणा-या प्रत्येक कामाची कामनिहाय नोंद ठेवणारी मोजमाप पुस्तिका ठेवली जाते.

The bills of the contractor's bills in the Public Works Department of Nashik | नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात ठेकेदारांच्या बिलांचा घोळ

नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात ठेकेदारांच्या बिलांचा घोळ

ठळक मुद्देअधिकारी-ठेकेदारांचे संगनमत : मोजमाप पुस्तिकाच गायबकार्यकारी अभियंत्यांनी आता त्या संदर्भात पोलीसात तक्रार दाखल करण्याचा इशाराच दिला आहे.



नाशिक : सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी व कामे घेणारे ठेकेदारांचे संगमनत आजवर सर्वश्रृत असून, त्यात आता नवीन प्रकरणाची भर पडली आहे. जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने करण्यात आलेल्या शेकडो कामांच्या मोजमाप पुस्तिकाच (एम.बी.) गायब झाल्या असून, परिणामी झालेल्या (?) कामांबाबत शंका निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे मोजमाप पुस्तिका ताब्यात ठेवण्याची जबाबदारी संबंधित अधिका-यांची असतांना अनेक वर्षे उलटूनही त्यांनी मोजमाप पुस्तिका जमा न केल्याने त्यांना स्मरणपत्रे पाठवूनही उपयोग होत नसल्याचे पाहून कार्यकारी अभियंत्यांनी आता त्या संदर्भात पोलीसात तक्रार दाखल करण्याचा इशाराच दिला आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून आदिवासी विकास विभाग व इतर शासकीय विभागांची विकास कामे करून घेतली जातात. संपुर्णत: बांधकाम खात्याच्या नियंत्रणाखाली ठेकेदारांकरवी करून घेतल्या जाणा-या कामांचे कार्यारंभ आदेश दिल्यानंतर सुरू होणा-या प्रत्येक कामाची कामनिहाय नोंद ठेवणारी मोजमाप पुस्तिका ठेवली जाते. त्या त्या कामाची जबाबदारी सोपविलेल्या कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, सहाय्यक अभियंत्यांनी आपल्या अखत्यारितील कामाची प्रगती व त्याचे या पुस्तिकेत वेळोवेळी मोजमाप नोंदविणे अपेक्षित असते. बहुतांशी वेळेस ही पुस्तिका काम करणा-या ठेकेदाराच्या ताब्यात सोयीसाठी ठेवली जाते. काम पुर्ण झाल्यानंतर संबंधित अधिका-याने कार्यारंभ आदेशाप्रमाणे कामकाज झाले किंवा नाही त्याची प्रत्यक्ष स्थळभेट देवून पाहणी करणे व तशी मोजमाप करून पुस्तिकेत नोंद करणे व या पुस्तिकेतच कामाचे बिल तयार केले जाते. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उत्तर विभागाच्या अखत्यारित येणा-या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या आदिवासी तालुक्यात गेल्या काही वर्षात करण्यात आलेल्या कामाच्या मोजमाप पुस्तिकाच आता सार्वजनिक बांधकाम खात्याला सापडत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात ही कामे झाली किंवा नाही याचा उलगडा करण्याचे कोणताही महत्वाचा पुरावा सार्वजनिक बांधकाम खात्याकडे सध्या उपलब्ध नसल्याने या कामाचे बिले अदा करण्याचे कामही पुर्णत: ठप्प झाले आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ताब्यात असलेल्या कागदपत्रांच्या आधारे कार्यकारी अभियंत्यांनी माहिती संकलित केली असता, जवळपास ३३५ कामांच्या मोजमाप पुस्तिका गायब झाल्या असून, संबंधित अधिका-यांना वारंवार विचारणा करूनही त्यांच्याकडून वा काम करणा-या ठेकेदाराकडून कोणतीही दाद दिली जात नसल्याने या कामांच्या भवितव्याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.

Web Title: The bills of the contractor's bills in the Public Works Department of Nashik