येवल्यात भुजबळांची विजयी मिरवणूक
By Admin | Updated: October 21, 2014 01:56 IST2014-10-21T01:48:10+5:302014-10-21T01:56:10+5:30
येवल्यात भुजबळांची विजयी मिरवणूक

येवल्यात भुजबळांची विजयी मिरवणूक
येवला : कोणत्याही पक्षाला पूर्ण जनादेश नाही, त्यामुळे स्थिर सरकारसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी स्थिर सरकारसाठी बाहेरून पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. हा सत्तेचा खेळ काही दिवस महाराष्ट्रात चालू राहील, सुरूच राहील. पण, स्थिर सरकार असले तर जनतेची कामे सहज व सोपी होतात. सरकारमध्ये असो अथवा नसो जनतेची कामे होणारच, असे प्रतिपादन येवल्यात माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सोमवारी सायंकाळी भुजबळ थेट हेलिकॉप्टरने येवल्यात आले. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. दोन घोड्यांच्या बग्गीत शहराच्या बाजारपेठेतून भुजबळ यांची शाही विजयी मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताश्यांचा गजर, गुलालाची उधळण करत या मिरवणुकीत ठिकठिकाणी दुतर्फा नागरिकांनी सत्कार केले. यावेळी टिळक मैदानात मतदारांचे आभार मानण्यासाठी सभा झाली.
यावेळी भुजबळ म्हणाले, जातीय राजकारण व मोदी लाटेमुळे नाशिकला हरलो होतो, पण येवल्याच्या जनतेने जातीपातीच्या राजकारणाला थारा दिला नाही विकासाला साथ दिली व विकास महत्त्वाचा मानला. मराठा कार्डपेक्षा विकास कार्ड महत्त्वाचे मानले. मी असेल अथवा नसेल, पण आपण जातीपातीचे राजकारण अव्हेरून कायम विकासामागेच उभे राहा, असे आवाहन केले. विकासामुळे व्यापार-उदीम वाढेल. आपण जरी मतांच्या बाबतीत वजाबाकी केली असली तरी विकासाच्या बाबतीत वजाबाकी करणार नाही. आता मी सर्व जनतेचा आमदार आहे. विकास हा माझा श्वास व विश्वास आहे. सरकारात असो वा नसो येवल्याचे रघुजीबाबा यांचे स्मारक, शिवसृष्टी, मांजरपाडा यासह सारी कामे होणारच असा शब्द भुजबळ यांनी जनतेला जाहीर आभार सभेमधून दिला. शेवटी शिवसेनाप्रमुख ठाकरे पिता-पुत्र येवल्यात आले व मला गाडण्याची भाषा करून गेले, पण विकासासाठी मी स्वत:ला येवल्यात गाडून घ्यायला तयार असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले. यावेळी येवला तालुकावासीयांच्या वतीने भुजबळ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अॅड. माणिक शिंदे, संतू झांबरे, महेंद्र काले, भाऊसाहेब भवर, उषा शिंदे, अशोक संकलेचा, हुसेन शेख, तात्या लहरे, नरेंद्र दराडे, मायावती पगारे, किशोर सोनवणे, डॉ. सुधीर जाधव, साहेबराव मढवई, यांची यावेळी भाषणे झाली. मोठ्या संख्येने नागरिक यासभेला उपस्थित होते. (वार्ताहर)