भुजबळ यांच्या कारागृह मुक्कामाने समता परिषद चिंतित : बैठक :
By Admin | Updated: April 27, 2017 18:24 IST2017-04-27T18:24:11+5:302017-04-27T18:24:11+5:30
ओबीसींची नव्याने जनगणना करण्याचा ठराव

भुजबळ यांच्या कारागृह मुक्कामाने समता परिषद चिंतित : बैठक :
नाशिक : अंमलबजावणी संचालनालयाच्या कारवाईमुळे (ईडी) गेल्या वर्षभरापासून समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांचा कारागृहातील मुक्काम वाढल्याने त्यांच्या अनुपस्थितीने परिषदेच्या कामकाजावरही परिणाम होत असल्याने परिषदेच्या राज्य कार्यकारिणीत चिंता व्यक्त करण्यात आली. देशातील ओबीसींची नव्याने तातडीने जनगणना करून त्याची आकडेवारी घोषित करण्यात यावी, असा ठरावही या बैठकीत करण्यात आला.
समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक नगर येथे नुकतीच पार पडली. त्यात अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. आघाडी सरकारच्या कालावधीत माजी खासदार समीर भुजबळ यांच्या पुढाकाराने केंद्र सरकारने ओबीसींची जनगणना हाती घेतली होती. मात्र केंद्रात सरकार बदलल्यानंतर ओबीसींची जनगणना पूर्ण करण्यात आली नाही. विशेष म्हणजे देशतील एससी तसेच एसटी या प्रवर्गाची जनगणना सरकारने पूर्ण करून त्याची आकडेवारी घोषित केली. त्यामुळे देशातील ओबीसींची नव्याने जनगणना होऊन त्याची आकडेवारी तातडीने घोषित करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तालुका पातळीपासून केंद्र सरकारपर्यंत निवेदन प्रसंगी आंदोलन करण्यात येऊन त्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा, असा ठराव करण्यात आला.