जिल्हा परिषदेची भोयेगाव शाळा देते आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 23:10 IST2019-12-23T23:10:08+5:302019-12-23T23:10:59+5:30
विविध शिक्षण मंडळे व माध्यमाच्या शाळांतील स्पर्धेच्या युगात विद्यार्थी व पालकांच्या अपेक्षा उंचावल्या असताना चांदवड तालुक्यातील भोयेगाव येथील जिल्हा परिषदेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला आहे. ही नाशिक जिल्ह्यातील सर्व उपक्रमशील शाळा व शिक्षकांना अभिमानास्पद बाब ठरली आहे.

जिल्हा परिषदेची भोयेगाव शाळा देते आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण
नामदेव भोर
नाशिक : विविध शिक्षण मंडळे व माध्यमाच्या शाळांतील स्पर्धेच्या युगात विद्यार्थी व पालकांच्या अपेक्षा उंचावल्या असताना चांदवड तालुक्यातील भोयेगाव येथील जिल्हा परिषदेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला आहे. ही नाशिक जिल्ह्यातील सर्व उपक्रमशील शाळा व शिक्षकांना अभिमानास्पद बाब ठरली आहे.
भोयेगाव येथील शाळेचे शिक्षकही आंतरराष्ट्रीय मंडळाच्या गुणवत्ता कक्षेच्या तज्ज्ञांच्या
निवडप्रक्रियेत गुणवत्ता सिद्ध करून विविध चाचण्या यशस्वीपणे उत्तीर्ण होऊन निवडले गेले आहे. त्याचा सकारात्मक परिणाम अध्ययनावरही दिसून येत असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांचीही अपेक्षापूर्ती होत आहे. इंटरनेटच्या मदतीने व्हिडीओ, पावर पॉइंट प्रेझेंटेशन, वर्ड फाइल डाउनलोड करून व स्वत: तयार करून अध्यापन केले जात असल्याने रोज काहीतरी नवीन अध्ययानाचा अनुभव मिळणार या उत्सुकतेने विद्यार्थी शाळेत येतात. शाळेत वर्गनिहाय विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आले असून, विद्यार्थी शिक्षकांच्या मदतनीने अॅपही तयार करतात. संस्कृत, हिंदी, इंग्रजी भाषेतून संवाद कार्यशाळा, दप्तरमुक्त शनिवार, कुतुहल कोपरा, क्युआर कोडनिर्मिती अशा उपक्रमांसह कांदा लागवड, वेल्डिंग दुकान, नर्सरी यात्रा, गड-किल्ले परिसर व व्यावसाय भेटीतून विद्यार्थ्यांना येथे सर्वांगीन शिक्षण मिळत आहे.
पालकांकडून मदतीचा हात
लोकसहभागातून शाळेच्या प्रत्येक वर्गात प्रोजेक्टर बसवून अतिशय प्रभावीपणे वापर सुरू आहे. इंटरनेट, व्हिडिओ, पीपीटी वर्ड फाइलद्वारे अध्यापन प्रक्रिया सुरू आहे.
भोयेगाव शिशुगट पॅटर्न
भोयेगाव शाळेत शिशुगटापासूनच विद्यार्थी तयार होतात. स्पर्धा परीक्षेत आवड वाढविण्यासाठी एक हजार प्रश्नसंच असलेले ‘चिमुकले बालक‘ नावाचे अॅप बनवले आहे. विद्यार्थी, पालक त्याचा उपयोग करतात.
शालेय विद्यार्थ्यांसाठी गणिताचे वास्तव आणि रोजच्या जीवनातील महत्त्व स्पष्ट करण्यासाठी सीबीएसईने आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या आर्यभट्ट परीक्षेत भोयेगाव शाळेतील १५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी सर्व १५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
गटकार्य, गटचर्चा याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये अधिकचा आत्मविश्वास निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांच्या वैचारिक पातळीत लक्षणीय वाढ होत आहे. विद्यार्थी व शिक्षक दोघेही शिक्षणाचा आनंद घेत आहेत
- निवृत्ती अहेर, मुख्याध्यापक