ईव्हीएम मशीन हॅक केल्याच्या संशयावरून भोंदूबाबाला चोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 00:51 IST2021-01-16T19:29:23+5:302021-01-17T00:51:51+5:30
नाशिक : सर्वत्र ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत असतानाच एका भोंदूबाबासह तिघांनी जादूटोण्याने ईव्हीएम मशीन हॅक केल्याच्या संशयावरून संतप्त ग्रामस्थांनी चांगलाच चोप देऊन पिटाळून लावल्याचा प्रकार शनिवारी (दि.१६) यशवंतनगर येथे उघडकीस आला आहे. ग्रामस्थांनी भोंदूबाबाची कार पकडून पोलिसांच्या स्वाधीन केली आहे. याप्रकरणी सटाणा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हीच ती भोंदूबाबाची कार.

यशवंतनगर ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडत असताना दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास कारमधून एका भोंदूबाबासह त्याच्या तीन शिष्यांचे गावात आगमन झाले. गावात आलेल्या भोंदूंनी मतदान केंद्राच्या परिसरात अघोरी जादूटोणा करण्यास सुरुवात केल्याने नागरिकांत एकच घबराट निर्माण झाली. भोंदूंच्या तंत्रमंत्राच्या जयघोषमुळे अचानक दोन ईव्हीएम मशीन बंद पडल्याने नागरिकांच्या भीतीत अधिक भर पडून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान या भोंदूबाबाला गावातीलच एका पॅनलप्रमुखाने आमंत्रित केले होते, अशी गावात चर्चा सुरू झाल्याने विरोधी पॅनलच्या संतप्त कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा थेट भोंदूबाबा आणि त्याच्या शिष्यांचा सुरू असलेल्या मंत्र घोषाच्या ठिकाणी वळवीत हल्ला चढवला. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी चौघांना बदडून काढले. यावेळी चौघांनी पळ काढला. ग्रामस्थांनी भोंदूबाबाची कार पकडून पोलिसांच्या ताब्यात दिली असून, या जादूटोण्याच्या प्रकाराविरुद्ध सटाणा पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.
कोण आहे भोंदूबाबा...
यशवंतनगरच्या ग्रामस्थांनी चोप दिलेल्या हा भोंदूबाबा व त्याचे शिष्य देवळा तालुक्यातील महालपाटणे येथील असून त्याचा मठ पुढाऱ्यांचा अड्डा असल्याचे बोलले जाते. देवळा तालुक्यातील एका पुढाऱ्याला जिल्हा परिषद निवडणूक जिंकून दिल्याने त्याने चक्क बाबाला आलिशान कार भेट दिली असून तिच्यावर जय महाकाय, असे नाव टाकले आहे. त्याच्या माध्यमातून मुंबई, ठाणे, रायगड येथील भक्तगण या भोंदूचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात. दिवसाढवळ्या कायद्याचे उल्लंघन करून अंधश्रद्धेला खुलेआम खतपाणी घालणाऱ्या या भोंदूबाबाने एका अर्थाने अंधश्रद्धा निर्मूलन समितीलाच खुले आव्हान दिले आहे. सटाणा पोलीस याप्रकरणी काय कारवाई करतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.