भिडे, एकबोटे यांच्या ‘वॉन्टेड’ पोस्टरने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 01:36 IST2018-01-11T23:47:45+5:302018-01-12T01:36:25+5:30
नाशिक : कोरेगाव-भीमा येथील दंगल प्रकरणी अनेक संघटनांनी शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान फाउण्डेशनचे अध्यक्ष संभाजी भिडे व समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे या दोघांविरुद्ध राज्यातील काही पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल झाल्याचा फायदा उठवून अज्ञात व्यक्तीने एकबोटे व भिडे यांना ‘वॉन्टेड’ ठरवून त्यांचे छायाचित्रे असलेले पोस्टर्स नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाणी लावल्याने खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांच्या नावे लावण्यात आलेल्या या पोस्टर्स प्रकरणी पुणे पोलिसांनी कानावर हात ठेवले असले तरी, स्थानिक पोलिसांना मात्र या पोस्टर्सची खबरबातदेखील नसल्याचे आढळून आले.

बुधवारी रात्री सदरचे पोस्टर्स नाशिक शहरातील जुने बस स्थानक, ठक्कर बजार बसस्थानक, अशोकस्तंभ, शालिमार चौक, नाशिकरोड रेल्वेस्थानकाबरोबरच शहरातील महत्त्वाचे व गर्दीच्या ठिकाणी तसेच एसटी बसवर चिकटवल्याचे गुरुवारी सकाळी उघडकीस आले आहे. मिलिंद एकबोटे व मनोहर भिडे असे नावे असलेल्या या पोस्टर्सवर दोघांचीही ब्लॅक अॅण्ड व्हाइट छायाचित्रे छापण्यात आली आहे आणि हे दिसल्यास संपर्क साधावा म्हणून ०२०२६१२५३९६/०२०२६२०८२०१ (पुणे पोलीस) असे दूरध्वनी क्रमांक दिलेले आहेत. दि. १ जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा येथे विजयस्तंभाला वंदन करून निघालेल्या कार्यकर्त्यांवर दगडफेक झाल्याने संपूर्ण राज्यात दंगल उसळली होती. यात अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेक, लाठीमाराच्या घटना घडून दोघा-तिघांना जीवही गमवावा लागला. भाजपेतर पक्षांनी या दंगलीमागे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजीराव भिडे व समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांचा हात असल्याचा व त्यांनीच दंगल पेटविल्याचा आरोप केला आहे. या दंगलीतून राज्यातील राजकारण ढवळून निघालेले असताना भिडे, एकबोटे यांनी प्रसिद्धीमाध्यमांसमोर येऊन आपली बाजूही मांडली आहे. त्यांच्याविरुद्ध पुण्यासह काही पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. या दंगलीची न्यायालयीन चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले असून, तूर्त हा वाद रस्त्यावरच्या लढाईतून शमला असला तरी, नेमका त्याचाच लाभ उठवून पुन्हा एकदा सामाजिक तणाव निर्माण करण्यासाठी भिडे, एकबोटे ‘वॉन्टेड’ असल्याच्या पोस्टर्सबाजी करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी अनेक ठिकाणी सदरचे पोस्टर्स पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. भिडे, एकबोटे खुले आम फिरत असताना पोलिसांच्या दप्तरी ते फरार दाखविण्याच्या या प्रकाराबद्दल काहींनी संशयही व्यक्त केला.