फेसबुकवरून अनोळखी सुंदरीने चॅटिंग केल्यास सावधान; ‘हनी ट्रॅप’ वाढले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:11 IST2021-06-17T04:11:17+5:302021-06-17T04:11:17+5:30
सोशल मीडिया हाताळताना सतर्कताही तितकीच महत्त्वाची आहे. व्हॉटसॲप, फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या सोशल सर्चइंजिनद्वारे अनेकदा सायबर गुन्हेगार वेगवेगळ्याप्रकारे आर्थिक फसवणूक करून ...

फेसबुकवरून अनोळखी सुंदरीने चॅटिंग केल्यास सावधान; ‘हनी ट्रॅप’ वाढले!
सोशल मीडिया हाताळताना सतर्कताही तितकीच महत्त्वाची आहे. व्हॉटसॲप, फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या सोशल सर्चइंजिनद्वारे अनेकदा सायबर गुन्हेगार वेगवेगळ्याप्रकारे आर्थिक फसवणूक करून हजारो ते लाखो रुपयेदेखील उकळतात. अशा घटना विविध शहरांमध्ये घडल्या आहेत. सेक्सटॉर्शनदेखील त्याचाच एक भाग आहे. सायबर गुन्हेगारांनी विरुद्धलिंगी आकर्षणाचा गैरफायदा घेत पुरुषांना अनोळखी महिलांच्या नावे ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ पाठवून ‘हनी ट्रॅप’च्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे अनोळखी व्यक्तीचा येणारा मैत्रीचा प्रस्ताव हा फेटाळूनच लावण्यास प्राधान्य द्यायला हवे, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही. फेसबुकसह अन्य कुठल्याही सोशल साइटवरून अशाप्रकारे ‘हनी ट्रॅप’ लावण्यात येऊ शकतो, असे सायबर तज्ज्ञ तन्मय दीक्षित यांनी सांगितले.
--इन्फो--
ही घ्या उदाहरणे
मला फेसबुकवरून मैत्रीची रिक्वेस्ट आली. सुरुवातीला मी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, त्या खात्यावरील तरुणीच्या छायाचित्रांच्या मोहात अडकलो आणि रात्री मी मैत्रीच्या विनंतीचा स्वीकार केला. हळूहळू काही दिवसांतच त्या तरुणीने अश्लील संवाद वैयक्तिकरीत्या साधण्यास सुरुवात केली. तिने अश्लील व्हिडिओही शेअर केले आणि मलाही अश्लील व्हिडिओ कॉल करण्यास भाग पाडले. यानंतर माझे छायाचित्र व व्हिडिओमध्ये एडिटिंग करून पैशांसाठी ती ब्लॅकमेलिंग करू लागली. मी नंतर ते अकाउंट ब्लॉक करून टाकले.
---
इन्स्टाग्रामवर एका अनोळख्या सुंदर तरुणीसोबत मैत्री जमली. तिने एकापेक्षा एक चांगले हॉट फोटो अपलोड केले होते. यामुळे ते फोटो बघून मी फसलाे. मैत्री जमल्यानंतर मीदेखील तिच्या संवादाला प्रतिसाद देऊ लागलो. तिने मेसेंजर ॲपद्वारे तिचे काही खासगी फोटो मला शेअर केले आणि मी तिच्या ‘हनी ट्रॅप’मध्ये कसा अडकलो ते मलाही कळले नाही. त्यानंतर मी सायबर पोलिसांकडे धाव घेतली.
---इन्फो--
अशी घ्यावी काळजी
सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीच्या संपर्कात येणे टाळावे. आपली वैयक्तिक माहिती कोणासोबतही शेअर करू नये. अनोळखी महिलेचा व्हिडिओ कॉल शक्यतो कट करावा. विरुद्धलिंगी आकर्षणाचा मोह आवरावा.
आपल्या फोनमध्ये खासगी फोटो सेव्ह करून ठेवू नयेत. ऑनलाईन फसवणूक झाली तर तत्काळ सायबर पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवराज बोरसे यांनी केले आहे.
---इन्फो---
असे ओढले जाते जाळ्यात
हॉट तरुणीचे फोटो असलेल्या खात्यावरून सुरुवातीला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली जाते. या रिक्वेस्टचा स्वीकार झाल्यानंतर त्या बनावट फेसबुक प्रोफाईलद्वारे अनोळखी तरुणी (?) अश्लील संवाद सुरू करते. बहुतांश तरुण या संवादाला बळी पडतात आणि त्या प्रोफाईलद्वारे येणाऱ्या व्हिडिओला प्रतिसाद देतात अन् जाळ्यात अडकतात. यानंतर समोरील व्यक्ती त्यांना ब्लॅकमेलिंग करत पैसे उकळण्याचा प्रयत्न करते.
---इन्फो---
शंका आल्यास तातडीने संपर्क साधा
एखाद्या फेसबुक प्रोफाईलबाबत जर शंका आली, तर तातडीने सायबर पोलिसांशी संपर्क साधावा. फेसबुकवरील मैत्रीची विनंती स्वीकारताना पडताळणी अवश्य करून घ्यावी. अनोळखी व्यक्ती आपल्या पूर्वीच्या किती मित्र-मैत्रिणींच्या संपर्कात आहे, हे तपासावे, अन्यथा अशी विनंती तत्काळ डिलिट करावी.
--कोट--
सोशल मीडियाच्या माध्यमातून कुठल्याहीप्रकारे आर्थिक व्यवहार तर करूच नये. मात्र, आपले खासगी फोटो, व्हिडिओदेखील कोणालाही शेअर करू नये. सायबर गुन्हेगार याचा गैरफायदा घेत आर्थिक फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. सतर्कता बाळगल्यास सेक्सटॉर्शनचा प्रकार रोखणे शक्य आहे.
-देवराज बोरसे, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे.
===Photopath===
160621\16nsk_33_16062021_13.jpg
===Caption===
फेसबुक