मंतरलेल्या रात्रीतील देखणा सोहळा
By Admin | Updated: September 25, 2015 23:48 IST2015-09-25T23:47:14+5:302015-09-25T23:48:00+5:30
मंतरलेल्या रात्रीतील देखणा सोहळा

मंतरलेल्या रात्रीतील देखणा सोहळा
त्र्यंबकेश्वर : सिंहस्थातील अखेरच्या पर्वणीनिमित्त निघणारी शाही मिरवणूक याचि देही याचि डोळा पाहता यावी, संत-माहात्म्यांचे दर्शन घेता यावे यासाठी देशभरातील लाखो भाविक गुरुवारपासूनच त्र्यंबकेश्वर नगरीत दाखल झाले होते. शुक्रवारी सकाळी १० वाजता सर्व आखाड्यांचे शाहीस्नान पूर्ण झाले. शाहीस्रानादरम्यान रात्रीचे ते १२ तास मंतरलेल्या रात्रीसारखेच भासले.
वेळ रात्री १० : त्र्यंबकेश्वर बसस्थानकापासून ते संपूर्ण गावाच्या परिसरात जिकडे-तिकडे बायामाणसांचे जथ्थेच्या जथ्थे... या गर्दीत कुणाची जेवणाची तयारी तर कुणाची रात्री झोपण्यासाठी जागा शोधण्याची लगबग.. कुणी मिळेल तिथे पथारी टाकलेली. अगदी गल्लीबोळातील घरांसमोरील मोकळ्या जागा आणि शासकीय कार्यालये, बॅँकांचे आवारही यातून सुटलेले नाही. काहींनी झोपण्याच्या जागेबरोबरच पहाटे सुरू होणारी मिरवणूक जवळून पाहता यावी म्हणून शाही मिरवणुकीच्या परतीच्या बॅरिकेडिंगमध्येच पथारी टाकलेली. यात महिला भाविकांची संख्या अधिक. रात्र जागविण्यासाठी कुणी गप्पांची मैफल रंगविली तर काही महिला घोळक्या घोळक्याने भजन, भक्तिगीते गाण्यात दंग. कोणी आखाडा परिसरात लावलेल्या मोठ्या पडद्यावर मालिका पाहण्यात गर्क.
कुशावर्त परिसरातही काहीसे असेच चित्र. काही भाविक रात्रीच स्रान उरकून परतीच्या मार्गाला लागण्याच्या तयारीत असल्याने रात्रीच्या गारव्यातही अनेक महिला, पुरुष कुशावर्तात डुबकी मारत होते.
रात्री ११ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्र्यंबकेश्वर येथे येण्यासाठी नाशिकहून निघाल्याचे कळल्यानंतर पोलीस प्रशासन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली. जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत भाविकांचे स्रान सुरू ठेवत प्रशासनाने मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाचे नियोजन केले. हळूहळू पोलिसांनी कुशावर्त परिसरातील गर्दी कमी करण्यास सुरुवात केली. रात्री ११.३० ते १२ दरम्यान भाविकांचे स्नान बंद झाले ते थेट दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजेपर्यंत. ध्वनिक्षेपकावरून तशा सूचना सुरू झाल्या. हळूहळू कुशावर्त परिसर मोकळा झाला आणि तेथे उरले केवळ माध्यम प्रतिनिधी आणि पोलीस कर्मचारी.
रात्री १२ : त्र्यंबक नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची कुशावर्ताची सफाई करण्याची लगबग. भाविकांनी पाण्यात टाकलेली फुले, कपडे काढत या कर्मचाऱ्यांनी कुशावर्ताची सफाई केली.
रात्री १२.४५ ते १ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुशावर्त परिसरात आगमन झाल्यानंतर कुशावर्त तीर्थ पूजन करून कैलास मानसरोवरातून आणलेले पाणी कुशावर्त तीर्थात प्रवाहित करण्यात आले. पूजा आटोपल्यानंतर पाच मिनिटे मुख्यमंत्र्यांनी माध्यम प्रतिनिधींशी चर्चा करून प्रस्थान केले. आणि इकडे पोलीस प्रशासनाने शाहीस्रानाच्या तयारीला सुरुवात केली.
रात्री २ : शाहीमार्गावर दुतर्फा भाविकांची आणि स्थानिकांची गर्दी वाढू लागली. मिळेल तिथे भाविकांनी जागा आरक्षित केल्या.
रात्री ३ : शाही मिरवणूक मार्गाची साफसफाई, गावातील या मार्गावर स्थानिक महिला आणि विविध संस्थांच्या कार्यकर्त्यांची सडा रांगोळीची लगबग तर दुसरीकडे आखाड्यांमध्ये मिरवणुकीसाठी रथ सजविण्याची तयारी, अनेक आखाड्यांमध्ये मध्यरात्रीपासूनच ही तयारी सुरू होती. साधारणत: ३.३० च्या दरम्यान शाही मिरवणुकीला सुरुवात झाली. पहाटे ४ वाजेच्या सुमारास पहिला आखाडा शाहीस्नानासाठी कुशावर्त तीर्थात उतरला आणि अनेक साधू-महंतांनी श्रद्धेची डुबकी घेतली. यानंतर एकापाठोपाठ आखाडे आपापल्या क्रमाने कुशावर्त तीर्थावर आले. सकाळी १० वाजता शेवटच्या आखाड्याचे शाहीस्रान झाले अन् प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. (प्रतिनिधी)