Beat Marshall police attack by thieving thieves | पानटपरी फोडणाऱ्या चोरट्याकडून बीट मार्शल पोलिसांवर हल्ला
पानटपरी फोडणाऱ्या चोरट्याकडून बीट मार्शल पोलिसांवर हल्ला

ठळक मुद्देगस्तीवरील बीट मार्शल पोलिसांनी रोखले

नाशिक : सातपूर येथे पानटपरीचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न करताना गस्तीवरील बीट मार्शल पोलिसांनी रोखले असता, त्याने दोघा बीट मार्शल पोलिसांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुरेश राजेंद्र पवार (३८, रा. श्रीराम चौक, सातपूर) असे संशयिताचे नाव आहे. सातपूर एमआयडीसी क्वार्टरसमोर असलेल्या पानटपरीचे कुलूप लोखंडी गजाने संशयित पवार तोडत होता. त्यावेळी सातपूर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल राहुल गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यास रोखले असता, सुरेश पवार याने दोघांना दमदाटी करत शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सातपूर पोलिसांत सरकारी कामात अडथळा आणणे व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात येऊन पवार यास पोलिसांनी अटक केली आहे.
शहर व परिसरात चोरट्यांचा उपद्रव वाढला असून चोरट्यांची मजल थेट पोलिसांवर धावून जाण्यापर्यंत वाढल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य अन् संतापही व्यक्त होत आहे. त्यामुळे शहरात ‘खाकी’चा धाक कमी झाला की काय? अशी शंकाही घेतली जात आहे. शहर परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कायदेशीर कारवाई करून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.


Web Title: Beat Marshall police attack by thieving thieves
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.