मिठाई घेताना सावधान, बेस्ट बिफोर पाहिले का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:30 IST2021-09-02T04:30:15+5:302021-09-02T04:30:15+5:30
सातपूर : खुली मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांच्या ट्रे वर ‘बेस्ट बिफोर’ (एक्सपायरी डेट) टाकणे बंधनकारक करण्यात आले आहे. तरीही ...

मिठाई घेताना सावधान, बेस्ट बिफोर पाहिले का?
सातपूर : खुली मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांच्या ट्रे वर ‘बेस्ट बिफोर’ (एक्सपायरी डेट) टाकणे बंधनकारक करण्यात आले आहे. तरीही या नियमांचे उल्लंघन केले जाते आणि मिठाईच्या बॉक्सवर तसा उल्लेखच नसतो. बऱ्याच ठिकाणी ग्राहक तसे तपासण्याची तसदी घेत नसले तरी मिठाई दुकानांची झाडाझडती घेऊन अन्न व औषध प्रशासन विभागाने ५४ मिठाईच्या दुकानांची तपासणी करून १५ दुकानांवर दंडात्मक कारवाई करून सुमारे अर्ध्या लाखाचा दंड वसूल केला आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांनी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. केंद्र सरकारच्या अन्न व औषध पुरवठा विभागाने १ ऑक्टोबर २०२० पासून खुली मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांच्या ट्रे वर बेस्ट बिफोर (एक्स्पायरी डेट) टाकणे बंधनकारक करण्यात आले आहे. कारण अनेक ठिकाणी मिठाई बॉक्सशिवाय देखील दिली जाते. विनापॅकिंग असणारा अन्न पदार्थ कधी बनविला किंवा तो पदार्थ किती दिवस खाण्यासाठी उपयुक्त आहे, याची माहिती ग्राहकांना दिली पाहिजे. उघड्यावर ठेवलेली मिठाई, शिळे अन्न पदार्थ खाल्ल्याने विषबाधा होण्याचे प्रकार घडतात. मुदत संपत असल्याची तारीख लिहिल्यास खराब मिठाईची विक्री होणार नाही. ग्राहकांनी देखील लक्ष दिले पाहिजे. मात्र, तसे होताना दिसत नाही.
इन्फो...
वर्षभरात सहा जणांवर कारवाई
अन्न व औषध प्रशासन विभागाने शहरातील ३६ मिठाईच्या दुकानांना भेट दिली असता ३० दुकानदारांनी पूर्तता केल्याचे आढळून आले. तर ६ दुकानदारांनी उल्लंघन केले म्हणून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून १७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. तसेच विनानोंदणी व्यवसाय करणाऱ्या २३ व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून ९९ हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यावर्षीही विभागाने ५४ मिठाईच्या दुकानांची तपासणी करून १५ दुकानांवर दंडात्मक कारवाई करून ५४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
मास्क गायब- सॅनिटायझर गायब!
साखळी दुकानांची मालिका असलेल्या स्वीट मार्टमधील मालक व नोकर मास्क वापरताना दिसून आले. मात्र, सिंगल काउंटरवर वापर करणाऱ्या छोट्या दुकानांमध्ये मात्र अशा प्रकारच्या नियमांचे पालन होताना आढळले नाही.
इन्फो...
सणासुदीच्या काळात उत्पादकांनी रोजच्या रोज आवश्यक तेवढीच मिठाई उत्पादित करावी. भारतीय अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण यांनी दिलेल्या निर्देशानुसार मिठाईवर ‘खाण्यास योग्य दिनांक’ (बेस्ट बिफोर) प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. उत्पादन विभाग व दुकानात संपूर्ण स्वच्छता ठेवावी. नियमांचे पालन न करणाऱ्या मिठाई दुकानांवर कारवाई केली जाते.
-गणेश परळीकर, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन.
इन्फो....
गोड खा, पण काळजी घ्या!
इन्फो...
पेठ रोड
शहरातील झोपडपट्टी भागात असलेल्या तीन दुकानांमध्ये रिॲलिटी चेक केले असता याठिकाणी बहुतांश मिठाईही प्लास्टिकच्या कॅरिबॅगमध्येच बांधून दिली जात असल्याचे आढळले. त्याठिकाणी ट्रेवर कालमर्यादेचा उल्लेख नव्हता.
सायखेडा रोड
नाशिकरोड परिसरातील सायखेडा रोड हा भाग खूपच मोठा आहे. काही दुकानांत मिठाई देताना त्यासाठी बॉक्स दिला जातो. त्यावर दुधाची मिठाई २४ तासांत खावी, असा उल्लेख आहे; परंतु काही दुकानांमध्ये कॅरिबॅग किंवा कागदात मिठाई बांधून दिली जाते. तेथे मुदतीचा विषय नाही.
नाशिक- पुणे महामार्ग
नाशिक महापालिका हद्द संपते तिथपासून नाशिक पुणे महामार्गावर काही अंतरापर्यंत अनेक दुकाने आहेत. त्यातील मोठी दुकाने वगळता अन्यत्र कुठेही अशा प्रकारे नियमांचे पालन होताना दिसत नाही.