पाण्यासाठी श्रेयवादाची रंगली लढाई
By Admin | Updated: December 24, 2016 00:58 IST2016-12-24T00:58:28+5:302016-12-24T00:58:42+5:30
उपोषणाची यशस्वी सांगता : पालखेडच्या आवर्तनातून बंधारे भरण्याचे आदेश

पाण्यासाठी श्रेयवादाची रंगली लढाई
येवला : तालुक्यातील पूर्वभागातील वितरिका क्रमांक ४६ ते ५२ या आठमाही करण्यासाठी व चालू आवर्तनातून पिण्यासाठी बंधारे भरून देण्याच्या मागणीसाठी लाभक्षेत्रातील २३ शेतकऱ्यांनी उपोषणाचे हत्त्यार उपसल्यानंतर त्याची पालकमंत्र्यांसह पाटबंधारे विभागाने तातडीने दखल घेतली व तसे आदेश संबंधित विभागाला देत लेखी आश्वासन दिले. मात्र श्रेयवादावरून तालुक्यात राजकारण पेटल्याचे चित्र दिसत आहे.
पालखेड तट डावा कालवा किमी ११० ते १२० वरील वितरिका क्र . ४६ ते ५२ खरीप कालवा आठमाही करण्याची मागणी प्रलंबित असून, २०१४ मध्ये जलसंपदा खात्याकडून चारी क्र. ४६ ते ५२ या चाऱ्यांकरिता पाणी मिळाले होते. परंतु या वर्षीच्या नियोजन बैठकीमध्ये त्या चारीला पाणी देण्याचे नियोजन केले गेले नाही. याबाबत उपोषणकर्त्यांची मागणी न्याय आहे, पाणी दिले पाहिजे, असे निवेदन राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीने दिले तर भाजपा आणि शिवसेनादेखील पाणीप्रश्नासाठी सरसावली. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमी सारी ताकद एकवटली आणि शेतकऱ्यांना पाणी मिळाले. आमच्यामुळेच पाणी आले, अशी हाकाटी राजकीय पक्षांनी पिटली असली तरी खरे पाणी मिळवण्याचे श्रेय उपोषणकर्त्यानाच आहे. पालखेड कालव्याच्या ४६ ते ५२ चारी वरील बंधारे मिळाले पाहिजे, अशी त्यांची मागणी होती. दरम्यान, चौथ्या दिवशी पाच उपोषणकर्ते अत्यवस्थ झाल्याने त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. त्यामुळे उपोषणाचे हत्यार अधिक धारदार झाल्याने पालकमंत्र्यांसह पाटबंधारे विभागाने चौथ्या दिवशी दखल घेऊन अखेर २३ डिसेंबरला वितरिका क्र. ४६ ते ५२ मधील कालव्यालगतचे बंधारे भरून देण्याचे लेखी आश्वासन उपोषणकर्त्यांना दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले.
उपोषणस्थळी तिसऱ्या दिवशी एकही शासकीय अधिकारी फिरकला नाही. त्यामुळे पालखेडच्या पाण्याने तालुक्यात चांगलाच पेट घेतला. दरम्यान, पाण्याची मागणी मान्य न झाल्यास रास्ता रोकोचे नियोजनही करण्यात आले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंपी, शाखा अभियंता सुदाम दाणे, उपविभागीय अधिकारी वैभव भागवत यांनी तातडीने येवला गाठत उपोषणकर्त्यांची भेट घेतली व पाणी सोडता येणार नाही, असे ठामपणे सांगितले. वितरिका क्र .४६ ते ५२चा विचार आगामी फेब्रुवारी महिन्यातील आवर्तनात केला जाईल. त्यामुळे आपण उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती केली होती. मात्र, आंदोलक संतप्त झाले व त्यांनी जोपर्यंत पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत अधिकाऱ्यांनाही कोठेही जाऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला. याबाबत भाजपाचे शहराध्यक्ष आनंद शिंदे यांनी पालकमंत्री गिरीश महाजन व दादा भुसे यांच्याशी चर्चा केली. अखेर महाजन यांनी अभियंता राजेंद्र शिंपी यांना पाणी सोडण्याचा आदेश
दिला आणि उपोषणकर्त्यांना उपोषण सोडले. (वार्ताहर)