कचरा संकलनालाही बॅरिकेडिंगचा अडसर

By Admin | Updated: August 30, 2015 23:21 IST2015-08-30T23:21:43+5:302015-08-30T23:21:43+5:30

वाहतुकीवर परिणाम : रविवारी दिवसभर संकलन

Barriers to garbage collection | कचरा संकलनालाही बॅरिकेडिंगचा अडसर

कचरा संकलनालाही बॅरिकेडिंगचा अडसर

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या शाही पर्वणीच्या दिवशी शनिवारी पोलिसांच्या अतिरेकी नियोजनाचा फटका भाविकांबरोबरच महापालिकेच्या घंटागाड्यांनाही बसला असून, ठिकठिकाणी केलेल्या बॅरिकेडिंगमुळे अनेक घंटागाड्या खतप्रकल्पावर पोहोचू न शकल्याने दिवसभरात केवळ ३१३ टन कचराच संकलित होऊ शकला. त्यामुळे रविवारी घंटागाडी कर्मचाऱ्यांना रात्री उशिरापर्यंत कचऱ्याची वाहतूक करावी लागली असून, मोठ्या प्रमाणावर कचरा खतप्रकल्पावर येऊन पडला आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यातील स्वच्छतेकडे महापालिकेने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार आरोग्य विभागामार्फत साधुग्रामसह रामकुंड परिसर, भाविक मार्ग आणि वाहनतळांवर स्वच्छतेसाठी सफाई कामगार नेमण्यात आले आहेत. या कामगारांकडून दैनंदिन सफाई केली जात असून, प्रामुख्याने साधुग्राम व गोदाघाट परिसरातून रोज सुमारे ४० ते ५० टन कचरा संकलित केला जात आहे. दरम्यान, शाही पर्वणीच्या दिवशी शहरात लाखोच्या संख्येने भाविक दाखल होण्याच्या शक्यतेने आणि कचऱ्यात मोठ्या प्रमाणावर वाढही होण्याची शक्यता गृहीत धरून वाढीव सुमारे २७ घंटागाड्यांचे नियोजन केले होते. याशिवाय अतिरिक्त कामगारांचीही व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी शहरभर केलेल्या बॅरिकेडिंगचा अडथळा घंटागाड्यांनाही आला आणि संकलित झालेला कचरा खतप्रकल्पावर नेण्याची समस्या निर्माण झाली होती. दिवसभरात जेथे शक्य असेल त्याठिकाणीच कचरा संकलित करून घंटागाड्यांनी खतप्रकल्प गाठला. शनिवारी पर्वणीच्या दिवशी दिवसभरात तपोवन व रामकुंड परिसरातून अवघा २५ टन कचराच खतप्रकल्पावर जाऊ शकला, तर शहरातील विविध भागांमधून २८८ टन कचरा संकलित होऊ शकला. एरव्ही तपोवन व रामकुंड परिसरातून ४५ ते ५५ टन आणि शहरातून सुमारे ४५० टन कचरा संकलित होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Barriers to garbage collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.