चार वाजता बार बंद, रस्त्यावरच ‘दे दारू’ सुरू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:10 IST2021-07-22T04:10:44+5:302021-07-22T04:10:44+5:30
कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता शहरात अंशत: लॉकडाऊन सुरूच आहे. जिल्हा प्रशासन, महापालिका, पोलीस प्रशासनाने दुपारी चार वाजेपर्यंतच आवश्यक त्या ...

चार वाजता बार बंद, रस्त्यावरच ‘दे दारू’ सुरू !
कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता शहरात अंशत: लॉकडाऊन सुरूच आहे. जिल्हा प्रशासन, महापालिका, पोलीस प्रशासनाने दुपारी चार वाजेपर्यंतच आवश्यक त्या सेवा देणाऱ्या दुकानांना व्यवसायाची परवानगी दिली आहे. मद्यविक्री दुपारी चार वाजेपासून थांबणे अनिवार्य असतानासुद्धा नियमांचा भंग करून सर्रासपणे शहरात दुकानांचे शटर खाली करीत मद्यपुरवठा आलेल्या ग्राहकांना सहजरीत्या केला जातो. यावेळी पोलीस वाहनाचा सायरन वाजला की मात्र सर्व काही शुकशुकाट होतो. हा सायरन कारवाईचा धाक दाखविण्यासाठी कमी आणि ‘इशारा’ देण्यासाठीच जणू अधिक वाजतो असे दिसते. सायरन कानी आला की समजावे, आता आटोपते घ्या, असाच हा अप्रत्यक्ष इशारा चार वाजता नव्हे, तर रात्री साडेआठ वाजता शहराच्या मध्यवर्ती भागात पोलिसांकडून दिला जातो.
----
रस्त्यावरच भरते मधुशाला
--
शरणपूर रोड-
मद्यविक्रीची दुकाने जरी चार वाजता बंद होत असली तरीदेखील सीबीएसपासून तर कॅनडा काॅर्नरपर्यंतच्या रस्त्यावर रात्री साडेआठ वाजेपर्यंत सहजरीत्या मद्यपींना दारू पुरविली जाते. दुकान बंद अन् व्यवसाय सुरू अशा रीतीने कामकाज चालविले जाते. मद्यपी दुकानांच्या कामगारांना हेरून त्यांच्याकडे पैसे देत भर रस्त्यावर मद्याची बाटली सहजरीत्या मिळवितो. अवघ्या काही मिनिटांत हा चोरीछुप्या पद्धतीचा व्यवहार पूर्ण होतो अन् तो कोणाच्याही लक्षात येत नाही.
- जवळचे पोलीस ठाणे- सरकारवाडा
पंचवटी-
भक्तीधाम ते दिंडोरी नाक्यापर्यंतच्या रस्त्यावरील मद्यविक्री करणाऱ्या दुकानांसह बारमधून दुपारी चार वाजेनंतरसुद्धा रात्री नऊ वाजेपर्यंत चोरट्या मार्गाने दारूविक्री केली जाते. दुकानांचे शटर बंद जरी असले तरी मद्यपी अचूकरीत्या त्या दुकानांच्या परिसरात वावरणाऱ्या कामगारांना हेरतात आणि त्यांच्याद्वारे दारू खरेदी करीत पोबारा करतात. पोलिसांचे गस्ती वाहन दूरवरूनच सायरन वाजवीत जणू सावधगिरीचा इशाराच एकप्रकारे देत केवळ औपचारिकता म्हणून गस्त पार पाडताना दिसतात.
- जवळचे पोलीस ठाणे : पंचवटी
--
पाथर्डी फाटा-
पाथर्डी गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूला इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या मद्यविक्री, बारमधून दुपारी चार वाजेनंतरसुद्धा दारूविक्री केली जाते. अंबड औद्योगिक वसाहतीतून परतणाऱ्या कामगारांची यावेळी दुकानांबाहेर दारू खरेदी करण्यासाठी संध्याकाळी उशिरापर्यंत गर्दी झालेली दिसून येते. मात्र, ही गर्दी पोलिसांच्या नजरेत येत नाही, कारण सर्वश्रुत आहे. एकूणच बार जरी चारला बंद झाले तरीदेखील रस्त्यावरच मधुशाला भरत असल्याचे चित्र येथे पाहावयास मिळते.
- जवळचे पोलीस ठाणे- अंबड
----
वाघाडी :
निमाणी ते काट्या मारुती चौक या वर्दळीच्या रस्त्यावर वाघाडी परिसरात मद्यविक्रीची दुकाने जरी चार वाजेच्या सुमारास बंद होत असली तरीदेखील ‘वाघाडी’ परिसरातील गल्लीबोळांत हातगाड्यांवरून मद्यविक्रीचा व्यवसाय रात्री आठ वाजेपर्यंत सहजरीत्या सुरू असलेला पाहावयास मिळतो. यामुळे या भागात येणाऱ्या मद्यपींकडून दारू रिचविल्यानंतर नागरिकांना त्रास देण्याच्या घटनाही घडतात, तसेच प्रवाशांची लूटदेखील करण्याचा अनेकदा प्रयत्न होतो.
जवळचे पोलीस ठाणे : पंचवटी