आज घरोघरी बाप्पांचे आगमन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:21 IST2021-09-10T04:21:01+5:302021-09-10T04:21:01+5:30
नाशिक : चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या लाडक्या गणरायांचे आज घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांच्या मंडपांमध्ये आगमन होणार ...

आज घरोघरी बाप्पांचे आगमन !
नाशिक : चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या लाडक्या गणरायांचे आज घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांच्या मंडपांमध्ये आगमन होणार आहे. यंदा वाजत-गाजत मिरवणुकांना परवानगी नसल्याने नागरिकांच्या उत्साहावर काहीसे विरजण पडले असले तरी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिक गणेशोत्सवासाठी मूर्ती, पूजा साहित्य खरेदीसाठी गुरुवारी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्याने बाजार तसेच मूर्ती दालनांबाहेर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
शहरातील बहुतांश मूर्ती विक्री दालनांमध्ये नोंदणी किंवा खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होती. निम्म्याहून अधिक नागरिकांकडून यंदा गणरायाच्या शाडूमातीच्या मूर्तीलाच प्राधान्य दिले जात आहे. मूर्तीच्या आकारापेक्षा तिच्या सुबकपणाला तसेच आकर्षक रंगसंगतीला प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून आले. सलग दुसऱ्या वर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असूनही नागरिकांमध्ये अमाप उत्साह दिसून येत आहे. दरम्यान, घरोघरी लाडक्या बाप्पाचे आगमन होणार असल्याने बालगोपाळ हरखून गेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ विविध शोभेच्या वस्तूंनी गजबजली आहे. तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत वाढत्या जनजागृतीमुळे नागरिक पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना पसंती देत आहेत. सलग दुसऱ्या वर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. प्रशासनाने सार्वजनिक गणेशोत्सवासाठी नियमावलीदेखील जाहीर केली आहे. दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या सणानिमित्त बाजारात खरेदीसाठी भाविकांची लगबग दिसून येत आहे. झेंडू, जाई, मोगरा, शेवंतीची फुले, फुलांच्या माळा, लाइटच्या वेगवेगळ्या माळा, मुकुट, सजावटीच्या विविध वस्तू यांनी बाजारपेठ सजली आहे. सजावटीच्या वस्तू, पूजेच्या साहित्याचे स्टॉलची दुकाने व अर्थातच गणेशमूर्ती दालनांमध्ये नागरिकांची पसंतीसाठीची लगबग दिसून येत आहे.
इन्फो
उत्साहाला उधाण
गतवर्षी पहिल्या लाटेत कोरोना अगदी ऐन बहरात असताना गणेशोत्सव आल्याने कोरोनाची धास्ती अधिक होती. त्या तुलनेत यंदा कोरोनाचा बहर बराचसा कमी झालेला असल्याने यंदाच्या गणेशोत्सवात गतवर्षीच्या तुलनेत बऱ्यापैकी उत्साह दिसून येत आहे. बहुतांश नागरिकांकडून गर्दीच्या ठिकाणी मास्कची दक्षता घेत उत्साहाला उधाण आले असल्याचेही दिसून येत आहे.
इन्फो
गणेशोत्सवाच्या उत्साहाने चैतन्य
कोरोनाच्या भीतीवर गणेशोत्सवाच्या उत्साहाने सध्या मात केली आहे. कपड्यांची दुकाने, पूजेच्या साहित्याची दुकाने, मिठाईची दुकाने, आरास व शोभेच्या वस्तूंची दुकाने सजली असून, ग्राहकांचीदेखील साहित्य घेण्यासाठी गर्दी होत आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या निमित्ताने बाजारात पुन्हा चैतन्य परतले असल्याचे दिसून येत आहे. यंदाही कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रशासनाकडून आवाहनदेखील करण्यात येत आहे.