सिन्नरला संचलनातून जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 23:55 IST2020-04-15T23:54:55+5:302020-04-15T23:55:16+5:30
२१ दिवसांच्या लॉकडाउन नंतर केंद्र व राज्य शासनाने पुन्हा ३० एप्रिल पर्यंत लॉकडाउन वाढविल्यामुळे सिन्नर शहरातील नागरिकांना कोरोना बाबत जनजागृती करण्यासाठी प्रांताधिकारी अर्चना पठारे यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर तहसील प्रशासन, सिन्नर नगर परिषद, सिन्नर पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरातून संचालन करण्यात आले.

सिन्नरला संचलनातून जनजागृती
सिन्नर : २१ दिवसांच्या लॉकडाउन नंतर केंद्र व राज्य शासनाने पुन्हा ३० एप्रिल पर्यंत लॉकडाउन वाढविल्यामुळे सिन्नर शहरातील नागरिकांना कोरोना बाबत जनजागृती करण्यासाठी प्रांताधिकारी अर्चना पठारे यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर तहसील प्रशासन, सिन्नर नगर परिषद, सिन्नर पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरातून संचालन करण्यात आले.
यावेळी घरीच राहा, सुरक्षित राहा, एकजूटचे दाखवू बळ, कोरोना काढेल पळ, कोरोना हारेल, देश जिंकेल, आया है कोरोना इससे मत डरना, पोलिसांना सहकार्य करा, पोलीस आहेत मित्र, करोनाशी लढू एकत्र, गो करोना गो, अशा घोषणा देत जनजागृती करण्यात आली.
सिन्नर नगर परिषद येथील हुतात्मा चौक येथून संचालनास प्रारंभ झाला. गंगावेस, राजे फतेसिंग मार्ग, वावी वेस, छत्रपती शिवाजी चौक, तानाजी चौक, क्रांती चौक, काजीपुरा, पडकी वेस, महात्मा फुले पुतळा, नेहरू चौक, नाशिक वेस, लाल चौक येथून सिन्नर नगर परिषद कार्यालय जवळील हुतात्मा स्मारक येथे रॅलीची राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली.
सर्वांच्या सेवेला सलाम करत दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापन बचत गटातील महिलांद्वारे रांगोळी काढून मानवंदना देण्यात आली तर छत्रपती शिवाजी चौक येथे रॅलीतील सहभागी सर्व अधिकारी कर्मचारी यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला.
यावेळी विभागीय प्रांताधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे, नगराध्यक्ष किरण डगळे, मुख्याधिकारी संजय केदार, पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर रॅलीची आयोजन करण्यात आले
होते.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मोहन बच्छाव, सिन्नर नगरपरिषद वैद्यकीय अधिकारी, डॉ. प्रशांत खैरनार, डॉ. निर्मला गायकवाड, बांधकाम अभियंता सुरेश गवांदे, नितीन परदेशी, रवींद्र देशमुख, शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव आदींसह आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी, यांनी सहभाग घेतला होता.सिन्नर शहरातील नागरिकांना कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी प्रांताधिकारी अर्चना पठारे यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर तहसील प्रशासन, सिन्नर नगर परिषद, सिन्नर पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरातून संचालन करण्यात आले.