पुरस्कार वापसी हा स्टंट

By Admin | Updated: July 25, 2016 23:56 IST2016-07-25T23:55:22+5:302016-07-25T23:56:17+5:30

भैरप्पांची टीका : सावाना शतकोत्तर अमृतमहोत्सवी सोहळ्यात बरसले

Award return stunt | पुरस्कार वापसी हा स्टंट

पुरस्कार वापसी हा स्टंट

नाशिक : सरकारने गेल्या साठ वर्षांत अठरा भाषांमध्ये हजारो साहित्यिकांना पुरस्कार दिले; पण त्यापैकी अवघ्या तीस जणांनी पुरस्कार परत केले. त्या सर्वांच्या निष्ठा डाव्यांशी एकवटलेल्या होत्या. मोदी सरकार आल्यामुळे बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुरस्कार वापसी हा स्टंट होता. म्हणूनच निवडणूक झाल्यावर पुरस्कार वापसीही थांबली, अशी घणाघाती टीका प्रख्यात कन्नड साहित्यिक एस. एल. भैरप्पा यांनी केली.
सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने शतकोत्तर अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सोमवारी सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमात भैरप्पा यांनी ‘भारतीयत्व व भारतीय साहित्य’ या विषयावर संवाद साधला. ते म्हणाले, मोदी सरकार आल्यावर साहित्यिकांनी पुरस्कार वापसी सुरू केली. माध्यमांनीही त्यांना प्रसिद्धी दिली; मात्र बिहार निवडणुकीनंतर हे सगळेच थांबले. हे सारे लोक कम्युनिस्टांशी संबंधित होते. कम्युनिस्टांनी आधी देशात सत्ता मिळवण्याचे प्रयत्न केले. ते न जमल्याने त्यांनी साहित्य, शिक्षणासारख्या क्षेत्रावर पगडा निर्माण केला. नुकतेच घडलेले जेएनयू प्रकरण याचेच उदाहरण आहे. अनेक शिक्षक, प्राध्यापक डाव्या विचारांचे असून, त्यांना लाखभर रुपये पगार दिला जातो. तेवढा पगार घेण्याइतकी त्यांची पात्रता तरी आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. भारतीय साहित्याबद्दल बोलताना भैरप्पा म्हणाले, भारतावर अनेक आक्रमणे झाली. मुस्लीम शासनकर्त्यांच्या काळात देशातील ३५ हजार मंदिरे पाडली गेली, वेद व अन्य साहित्य नष्ट करण्यात आले; मात्र आपले तत्त्वज्ञान व भाषा टिकून राहिली. ब्रिटिश सत्ताकाळात आपण इंग्रजीसह युरोपीय साहित्य वाचू लागलो. याच काळात भारतात नव्या साहित्याचा उगम झाला. त्याआधी आपल्याकडे बोधकथा वा पुराणकथांचे कथन होत असे. नंतर आपल्या कादंबऱ्यांतून वास्तवाचे चित्रण होऊ लागले खरे; मात्र त्यावर पाश्चात्त्य साहित्याचाच प्रभाव राहिला. आपण पाश्चात्त्यांची शैली उचलून आपल्या प्रथा-परंपरांचे प्रतिबिंब साहित्यात उमटवले. आपले लेखनतंत्र आजही पाश्चात्त्य साहित्यावर आधारलेले आहे. देशातील दारिद्र्यासारख्या समस्या सोडवण्यात तुमचा वाटा काय, या प्रश्नाचे उत्तर आपले साहित्यिक देऊ शकणार नाहीत. साहित्याच्या उद्देशाबाबतच आपले साहित्यिक संभ्रमित आहेत. आपल्याकडचे काही लेखक डावे, काही दलित, तर काही स्त्रीवादी असतात; पण भारतीय लेखक कधी होणार? त्यासाठी भारतीय साहित्य, तत्त्वज्ञान वाचावे लागेल. पाश्चात्त्यांची वचने उद्धृत करणाऱ्यांना भारताबद्दल काहीच माहीत नसते. सध्याच्या लेखकांना अभ्यासाचे वावडे आहे. त्यामुळे त्यांच्यात सर्जनशीलतेचा अभाव असल्याची टीकाही त्यांनी केली.
प्रख्यात हिंदी साहित्यिक डॉ. विष्णू खरे, ज्येष्ठ लेखिका उमा कुलकर्णी, महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड, सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, उपाध्यक्ष नरेश महाजन, अरविंद बेळे, सुरेश गायधनी आदि व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यवाह मिलिंद जहागिरदार यांनी प्रास्ताविक केले. किशोर पाठक, चंद्रकांत संकलेचा यांनी परिचय करून दिला. स्वानंद बेदरकर यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Award return stunt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.