विंचूरच्या एटीएमला महिनाभरापासून टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 00:12 IST2020-03-14T23:25:30+5:302020-03-15T00:12:23+5:30
अपुरा कर्मचारी वर्ग, ग्राहकांची खोळंबलेली कामे अन् बँकांचा मनमानीपणा यामुळे येथील बँक खातेदार अक्षरश: वैतागले आहेत. येथे राष्ट्रीयीकृत स्टेट बँक व बॅँक आॅफ बडोदाचे एटीएम जवळपास महिना दीड महिन्यापासून कुलूपबंद असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

विंचूरच्या एटीएमला महिनाभरापासून टाळे
विंचूर : अपुरा कर्मचारी वर्ग, ग्राहकांची खोळंबलेली कामे अन् बँकांचा मनमानीपणा यामुळे
येथील बँक खातेदार अक्षरश: वैतागले आहेत. येथे राष्ट्रीयीकृत स्टेट बँक व बॅँक आॅफ बडोदाचे एटीएम जवळपास महिना दीड महिन्यापासून कुलूपबंद असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
सुमारे पंधरा हजारांच्यावर लोकसंख्या असलेले विंचूर गाव आठ ते दहा खेडेगावांचे केंद्रस्थान आहे. परिसरातील गावे व वाड्यांवरील नागरिकांना आर्थिक व्यवहारासाठी विंचूरला पसंती देतात. असे असतानाही येथे मोठ्या प्रमाणात चलन फिरत असूनही बँकांकडून एटीएम बंद ठेवले जात असल्याने नाराजी व्यक्त केली आहे.
मनमानीपणाचा जाच
विंचूर उपबाजार आवारात दररोज शेकडो वाहनांमधून शेतकरी आपला शेतमाल आणतात. परिणामी येथील आर्थिक व्यवहारात मोठी उलाढाल होत असून, चलन देवाण-घेवाण होत असल्याने चोवीस तास पैसे उपलब्ध करून देणारी सेवा म्हणून बघितल्या जाणाऱ्या एटीएमला मात्र कायम टाळे असल्याने शेतकरीवर्गात असंतोषाचे वातावरण आहे. नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील गाव असूनही येथे एटीएमची सुविधा मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. खातेदारांची मोठी संख्या आणि आर्थिक उलाढाल असूनही बँकांच्या मनमानीपणाचा जाच सहन करावा लागत असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे.