बौद्ध उपासकांच्या मिरवणुकीने वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:37 IST2017-09-24T00:37:03+5:302017-09-24T00:37:09+5:30
शहरात सुरू असलेल्या महाबौद्ध धम्म मेळाव्यांतर्गत शहरातून शनिवारी (दि.२३) सुमारे सातशेहून अधिक श्रामनेर बौद्ध उपासकांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

बौद्ध उपासकांच्या मिरवणुकीने वेधले लक्ष
नाशिक : शहरात सुरू असलेल्या महाबौद्ध धम्म मेळाव्यांतर्गत शहरातून शनिवारी (दि.२३) सुमारे सातशेहून अधिक श्रामनेर बौद्ध उपासकांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. शहरातील इदगाह मैदानावर मागील गुरुवारपासून महाबौद्ध धम्म मेळावा सुरू आहे. अखिल भारतीय समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा आणि बीएमए ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मेळाव्यामध्ये येत्या शनिवारपर्यंत (दि.३०) महाश्रामनेर शिबिरसह विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. दरम्यान, आज धम्म मेळाव्याच्या ठिकाणापासून म्हसरूळपर्यंत भव्य धम्म मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत महापुरुषांचे देखावे सादर करण्यात आले होते. या सर्व चित्ररथांवर बाबासाहेबांनी लिहिलेल्या सुविचारांचे फलक लावण्यात आले होते. दुपारी सव्वा वाजता मिरवणुकीला इदगाह मैदानावरून प्रारंभ झाला. तेथून ती म्हसरूळकडे रवाना झाली. मिरवणूक मार्गावर बग्गीच्या अगोदर एका वाहनात बसलेल्या महिलांकडून पुष्पवृष्टी केली जात होती, तर या वाहनाच्या पुढे चालत असलेल्या पाण्याच्या टॅँकरद्वारे मार्गावर स्वच्छता केली जात होती. सर्व चित्ररथांमागे महाश्रामनेर शिबिरामध्ये सहभागी झालेले सातशेहून अधिक बौद्ध उपासक भगवे वस्त्र परिधान करून संचलन करीत होते. प्रत्येक उपासकाने डोक्यावर धरलेली पंचशील रंगाची छत्री नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती.