कोयत्याने चढविला युवकावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:39 IST2021-02-05T05:39:14+5:302021-02-05T05:39:14+5:30
रविवारी (दि.२४) दीड वाजेच्या सुमारास संशयित प्रकाश याने संत कबीर येथील साईबाबा मंदिर परिसरात भांडणाची कुरापत काढत सागरवर ...

कोयत्याने चढविला युवकावर हल्ला
रविवारी (दि.२४) दीड वाजेच्या सुमारास संशयित प्रकाश याने संत कबीर येथील साईबाबा मंदिर परिसरात भांडणाची कुरापत काढत सागरवर कोयत्याने वार केले. यात सागरचे डोके व मानेवर दुखापत झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी संशयित प्रकाशला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
--------
भरधाव कारच्या धडकेत चौघे जखमी
नाशिक : दिंडोरी रोडवरून भरधाव जाणाऱ्या एका कारचालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत त्याच्या ताब्यातील वाहन (एमएच १५ जीएक्स २१३३) बेदरकारपणे चालवून एका दुचाकीला तसेच तिघा पादचाऱ्यांनाही धडक दिली. य अपघातात दुचाकीचालकासह तिघे पादचारी गंभीररीत्या जखमी झाले आहेत. कारचालकाने अपघातानंतर जखमींना मदत न देता घटनास्थळावरून पोबारा केला. रविवारी (दि. २४) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास दिंडोरी रोडवरून वेगाने जात असताना चालकाने त्याची कार अचानकपणे वळविली. यावेळी मार्केटकडून पेठ फाट्याकडे जाणारी दुचाकी (एमएच १५ जीजी ९५५९)ला धडक देऊन चालकाला जखमी केले. यानंतरही त्याने वाहनावर नियंत्रण मिळविले नाही आणि यापुढे रस्त्याने पायी जाणारे वंदू निंबा मसराम, सिंधू वंदू मसराम (रा. गौंडवाडी, पंचवटी) व चंदर गणपत सापटे (रा. शनिमंदिर जवळ, पंचवटी) यांना खबर दिली. याप्रकरणी भरत किसन गावंडे (रा. हरिओम नगर, पेठ रोड) याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
--------
लेखानगर येथून दुचाकी लांबविली.
नाशिक : लेखानगर येथील भारतीय स्टेट बॅँकेसमोर उभी केलेली अॅक्टिव्हा मोपेड दुचाकी अज्ञात चोरट्याने गायब केली. याप्रकरणी प्रमोद वसंत घरटे (रा. मंगलमूर्तीनगर, जुने सिडको) यांनी अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी (दि. २१) दुपारी फिर्यादी घरटे यांनी त्यांची अॅक्टिव्हा (एमएच १५ एचजे ७६०९) लेखानगर येथील स्टेट बॅँकेसमोर उभी केली असताना अज्ञाताने चोरून नेली.
---------
तडीपार गुंडांना ठोकल्या बेड्या
नाशिक : तडीपारीचे आदेश झुगारून शहरात वास्तव्य करणाऱ्या दोघा सराईत गुंडांच्या मुसक्या बांधण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सातपूर पोलिसांनी संशयित अजय महादू मोरे (रा. अशोकनगर) यास बसथांब्याच्या परिसरातून शनिवारी (दि. २३) ताब्यात घेतले. अजयला सहा महिन्यांकरिता शहरातून हद्दपार करण्यात आले असताना पूर्वपरवानगीशिवाय तो शहरात वावरत होता. त्याच्याविरुध्द सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अंबड पोलिसांनी संशयित ऋषिकेश अशोक राजगीरे (रा. चुंचाळे शिवार) यास ताब्यात घेतले. ऋषिकेशला दोन वर्षांकरिता शहरातून हद्दपार करण्यात आले असतानाही तो शहरात आढळून आला, यावेळी त्याच्याकडे बेकायदा बाळगलेली ५०० रुपये किमतीची तलवार मिळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.
----------
जुगाराचा बेकायदा डाव उधळला
नाशिक : बेकायदा रंगविलेला जुगाराचा डाव मुंबई नाका पोलिसांनी उधळून लावला. पोलिसांनी जुगारींवर शनिवारी (दि. २३) सायंकाळी कारवाई केली. संशयित असिफ गुलाम मुर्तुजा (रा. पखाल रोड) व त्याचे पंधरा साथीदार हे अवैधरीत्या जुगार खेळताना पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी ४० हजार १७० रुपयांची रोकड जप्त केली आहे. शनिवारी सायंकाळी लक्ष्मी कॉम्प्लेक्स, वडाळा नाका येथे हे संशयित ‘अंदर बाहर’ नावाचा जुगार खेळत होते. मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. या संशयितांविरुध्द मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.