वादग्रस्त अधिकाऱ्याच्या बदलीचे आश्वासन
By Admin | Updated: October 25, 2016 00:53 IST2016-10-25T00:50:27+5:302016-10-25T00:53:13+5:30
जोपूळ केंद्र : शिक्षक उपोषणाची यशस्वी सांगता

वादग्रस्त अधिकाऱ्याच्या बदलीचे आश्वासन
दिंडोरी : वादग्रस्त शिक्षणविस्तार अधिकारी निकम यांची दिंडोरी तालुक्यातून बदली केली जाईल, असे आश्वासन आमदार नरहरी झिरवाळ यांनी उपोषणकर्त्या शिक्षकांना दिल्यानंतर त्यांच्या हस्ते फळाचा रस देऊन चार दिवसांपासून सुरु असलेल्या उपोषणाची सांगता करण्यात आली. जोपूळ केंद्रातील वादग्रस्त शिक्षणविस्तार अधिकारी आर. एन. निकम यांच्या कार्यपद्धतीविरोधात पंचायत समिती कार्यालयासमोर तालुका शिक्षक कृती समितीच्या माध्यमातून जोपूळ व खेडगाव केंद्रातील चोवीस शाळांमधील सुमारे शंभर शिक्षकांनी धरणे आंदोलन व आमरण उपोषण सुरू केले होते. आर. एन. निकम यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली होती . या उपोषणाची प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यामुळे शिक्षकांना चार दिवस उपोषण व धरणे आंदोलन करावे लागले. उपोषण सांगतेवेळी माजी आमदार धनराज महाले, रामदास चारोस्कर, जि.प उपाध्यक्ष प्रकाश वडजे, पंचायत समिती सभापती अलका चौधरी, उपसभापती छाया डोखळे, उपनगराध्यक्ष सचिन देशमुख, पंचायत समिती सदस्य भास्कर भगरे, माजी सभापती खंडेराव गोतरणे, पुष्पा चौधरी, सुनील मातेरे, डॉ. गोसावी आदि उपस्थित होते. उपोषणास संजय पगार, आप्पा बच्छाव, रावसाहेब जाधव, आनंदा चारोस्कर, मारु ती कुंदे, सचिन गुंजाळ हे प्रतिनिधी बसले होते. (वार्ताहर)