कुंभमेळ्यात आर्टिलरीची दोन हेलीकॉप्टर
By Admin | Updated: April 9, 2015 00:38 IST2015-04-09T00:33:19+5:302015-04-09T00:38:09+5:30
आपत्ती व्यवस्थापन : हेलीपॅडच्या जागेचा शोध

कुंभमेळ्यात आर्टिलरीची दोन हेलीकॉप्टर
नाशिक : येथे जुलै महिन्यापासून सुरू होणाऱ्या कुंभमेळ्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी देवळाली कॅम्प येथील आर्टिलरी सेंटरने दोन हेलीकॉप्टर देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे आता शहरात हेलीपॅड उभारण्याची तयारी सुरू असून, जागेचा शोध सुरू आहे.
कुंभमेळा सर्वार्थाने आव्हानात्मक आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने बारकाईने नियोजन सुरू केले आहे. कुंभमेळ्यात कोणत्याही प्रकाराच्या आपत्तीशी मुकाबला करण्याची तयारी केली आहे. त्याअंतर्गत आपत्ती व्यवस्थापनाची बैठक झाली. यावेळी या विषयांवर चर्चा करण्यात आली. आर्टिलरी सेंटरने दोन हेलीकॉप्टर देण्याची तयारी केली आहे. आपत्तकालीन परिस्थितीत हे हेलीकॉप्टर उपयोगात येतील, त्यासाठीच दोन हेलीपॅड शहरात उभारण्यात येणार आहेत. जिल्हा प्रशासनाने आपल्या आवश्यकतेचे पत्र आर्टिलरी सेंटरला द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर येथेही अशाच प्रकारे हेलीपॅड तयार केली जाऊ शकते.
दरम्यान, कुंभमेळ्यासाठी आता सूक्ष्म नियोजनाला प्रारंभ होत असून, गुरुवारपासून चार-चार विभागांच्या बैठका घेण्यात येणार आहेत. त्यातून प्रत्येक गोष्टीचे नियोजन आणि त्याचे आराखडे तयार केले जाणार आहेत. कोणत्याही सेक्टरमध्ये असलेले विविध विभागांच्या अधिकाऱ्यांचे पथक आणि संपूर्ण शहर स्तरावर पथक अशा प्रकारची रचना असणार आहे. त्यामुळे निर्णय घेणे सोपे जाईल.
वाहनतळासाठीदेखील तत्काळ निर्णयांसाठी तहसीलदार दर्जाचे अधिकारी नियुक्त केले जाणार आहेत, अशा सर्व प्रकारच्या बारकाव्यांची चर्चा करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)