मालेगावी रंगीबेरंगी राख्यांचे बाजारात आगमन

By Admin | Updated: August 8, 2014 00:53 IST2014-08-07T22:01:49+5:302014-08-08T00:53:26+5:30

मालेगावी रंगीबेरंगी राख्यांचे बाजारात आगमन

Arrival at Malegaqui Colorful Retails | मालेगावी रंगीबेरंगी राख्यांचे बाजारात आगमन

मालेगावी रंगीबेरंगी राख्यांचे बाजारात आगमन

 

मालेगाव : बहीण-भावामधील अतूट नात्याच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधन सणाला केवळ काही दिवसच बाकी असल्याने आकर्षक राख्यांनी मालेगावची बाजारपेठ सजली असून, महिलावर्गाने खरेदीसाठी गर्दी केल्याने गजबजून गेली आहे. बाजारात विविध प्रकारच्या राख्या उपलब्ध झाल्या आहेत. त्यामध्ये कार्टून, चमकी या पारंपरिक राख्यांसहित धातूच्या राख्या आणि पंतप्रधान मोदींचा मुखवटा असलेल्या राख्याही उपलब्ध झाल्या आहेत.
बहीण-भावाच्या अतूट प्रेमाचा सण असलेला रक्षाबंधन येत्या रविवारी सर्वत्र साजरा होत आहे. मालेगाव शहरातील संगमेश्वरातील महात्मा फुले रोड, मोसमपूल, महादेव मंदिर, सरदार चौक, रामसेतू, सपाटी बाजार, रावळगाव नाका, कॅम्प मेनरोड, सटाणा नाका आदि भागातील दुकानांच्या अग्रभागी विविध आकारातील आकर्षक राख्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. काही ठिकाणी विशेष स्टॉल्स् उभारण्यात आले आहेत. शहर परिसरातून अनेक सासरवाशिण महिला बाहेरगावी राहणाऱ्या आपल्या लाडक्या भावास राख्या पाठविण्यास सध्या मग्न आहेत. पोस्टाद्वारे वा कुरिअरद्वारे राख्या पाठविल्या जात आहेत. दुपारनंतर बाजारपेठांमध्ये महिलांची गर्दी दिसून येत आहे. कोलकत्ता, मुंबई आदि ठिकाणांहून राख्या उपलब्ध होत असून, वाहतुकीच्या खर्चात वाढ झाल्याने राख्यांच्या किमती १५ ते २० टक्के वाढल्या आहेत.
शहरातील सराफ व्यावसायिकांकडे सोने व चांदीपासून तयार केलेल्या राख्या विक्रीसाठी उपलब्ध असून, या राख्यांना उच्च वर्गाकडून चांगली मागणी असल्याचे गोविंद दुसाने (सराफ) या पेढीचे राजेश दुसाने यांनी सांगितले. याशिवाय लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाची भेट देण्यासाठी विविध भेटवस्तू, तयार कपडे, साड्या, दागिने यांचीही बाजारपेठेत रेलचेल दिसून येत आहे.(वार्ताहर)

Web Title: Arrival at Malegaqui Colorful Retails

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.