गणरायाबरोबर येणाऱ्या गौरी सणाला भक्तिभावाचे व व माहेरवाशिणीचे वेगळे नाते निर्माण झाले आहे. गौरींचे आगमन, मनोभावे पूजन व विसर्जन असा तीन दिवसीय चालणारा गौरी-गणपतीचा सण अनेक कुटुंबीयांना आपुलकीचा वाटतो. माहेरवाशिणीचे लाड करण्याची पद्धत गौरी-गणपतीच्या (महालक्ष्मी) रूपाने साजरी केली जाते. या गौरींचे रविवारी मोठ्या उत्साहात आणि मनोभावे पूजन करून स्वागत झाले.
अनेक कुटुंबात आपल्या परंपरा आणि प्रथेप्रमाणे गौरी (महालक्ष्मी) बसविल्या जातात. रविवारी पहिल्या दिवशी घराजवळील तुळशीपासून पावला-पावलांनी डोक्यावरून या गौरींना भक्तिभावाने घरात आणले गेले, गौरी आली सोन्याच्या पावलांनी, गौरी आली चांदीच्या पावलांनी.. गौरी आली गायवासराच्या पावलांनी असे म्हणत स्वागत करण्यात आले. त्यांना नवीन वस्त्र, दागदागिने घालून सजविण्यात आले.
गणरायाच्या आगमनानंतर घरोघरी रविवारी गौरीचे (महालक्ष्मी) उत्साहात आगमन झाले. रविवारी दिवसभर अनुराधा नक्षत्र असल्याने दिवसभरात गौरींचे झाले. आगमन त्यावेळी आपल्या घरी माहेरवाशीण म्हणून या गौरींसाठी आकर्षक सजावट करण्यात आली.
चौकट-
आज पूजन, नैवेद्य आणि हळदीकुंकू
गौरींचे रविवारी आगमन झाल्यानंतर सोमवारी घरोघरी पारंपरिक पद्धतीने पूजा, अभिषेक, आरती करून पुरणपोळीसह विविध पदार्थाचा नैवेद्य गौरींना दाखविण्यात येणार आहे. सायंकाळी हळदीकुंकवाचा कार्यक्रम होईल. गौरींना १६ भाज्यांचा नैवेद्य दाखविला जातो. यामध्ये प्रामुख्याने बटाटा, भेंडी, गोराणी, आळू, मुळा, वटाणा, ढोबळी मिरची, कोबी, फ्लॉवर, घोसाळे, पालक अशा विविध भाज्यांचा समावेश असतो. मंगळवारी गौरींचे विसर्जन होणार आहे.
फोटो - १२ सिन्नर गौरी
गणरायापाठोपाठ रविवारी गौरी (महालक्ष्मी)चे आगमन झाले. महिलांनी गौरींचे मनोभावे स्वागत करून स्थापना केली.