अरेरावी : कागदपत्र दाखवूनही केली टोलची मागणी; सहाय्यकास मारहाण
By Admin | Updated: December 20, 2014 22:37 IST2014-12-20T22:37:35+5:302014-12-20T22:37:57+5:30
टोल नाक्यावर अडविले लष्कराचे वाहन

अरेरावी : कागदपत्र दाखवूनही केली टोलची मागणी; सहाय्यकास मारहाण
पिंपळगाव बसवंत : आमदार, खासदार, महत्त्वाच्या व्यक्ती आदिंसह पोलीस अधिकाऱ्यांनाही आपल्या उर्मट वर्तणुकीतून त्रास देणाऱ्या पिंपळगाव बसवंत येथील वादग्रस्त टोल नाक्यावर महिला कर्मचाऱ्यांबरोबरच आता येथील सुरक्षा रक्षकांनी ‘भाईगिरी’ सुरू केली असून, अनेक वाहनधारकांना त्रास देणे, मानसिक छळ करणे, धक्काबुक्की करून थेट मारहाण करण्याचे प्रकार नित्याचे झाले
आहेत.
गुरुवारी रात्री तर येथील मद्य प्राशन केलेल्या सुरक्षा रक्षकांनी थेट लष्कराच्या वाहनाला अडवून टोलची मागणी केली. तर ट्रकचालक व त्याच्या सहाय्यकास धक्काबुक्की
करून मारहाण करण्यापर्यंत मजल मारली. मद्य प्राशन करून वाहनधारकांना सतत त्रास देणाऱ्या सुरक्षा रक्षक व टोल प्रशासनावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्रस्त वाहनधारकांनी केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता लष्कराचे महत्त्वाचे साहित्य घेऊन मुंबईहून चंद्रपूरकडे निघालेला ट्रक (एमएच ०४ एफव्ही ९३३८) येथील टोल नाक्यावर आला. ट्रकवर ‘आर्मी आॅन ड्यूटी’ असा फलक लावलेला होता. तसेच टोलनाका व जकात आकारणी करू नये असे लष्करी अधिकाऱ्यांचे पत्रही ट्रकचालकाकडे होते. ट्रकचालकाने सदर पत्राची प्रत दाखविली व ट्रक सोडण्याची विनंती केली. मात्र टोल नाक्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकाने ट्रकचालकाकडे टोलची मागणी करीत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच इतर सुरक्षा कर्मचाऱ्यांना बोलावून ट्रकचालक व त्याच्या सहाय्यकास धक्काबुक्की करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. (वार्ताहर)