रिपाइंच्या विविध संघटनांचा ‘आक्रोश’ मोर्चा
By Admin | Updated: July 22, 2015 00:53 IST2015-07-22T00:53:03+5:302015-07-22T00:53:12+5:30
शासन विरोधात घोषणाबाजी : दलितांवरील अत्याचारांचा निषेध

रिपाइंच्या विविध संघटनांचा ‘आक्रोश’ मोर्चा
नाशिकरोड : शिर्डी येथील सागर शेजवळ युवकाच्या खुनातील फरारी आरोपींना अटक करा, दलितांवरील वाढते अन्याय-अत्याचाराच्या निषेधार्थ दलित अन्याय-अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर ‘आक्रोश मोर्चा’ काढून निवेदन देण्यात आले.
रिपाइं-दलित चळवळीतील विविध पक्ष, संघटना यांच्या दलित अन्याय-अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने शिर्डी येथील सागर शेजवळ खून प्रकरण व दलितांवरील अन्याय-अत्याचाराच्या निषेधार्थ मंगळवारी दुपारी १२ वाजता बिटको चौकातून सत्कार पॉर्इंट, सुभाषरोड, आंबेडकर पुतळा, शिवाजी पुतळामार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला होता.
राज्यशासन व जातीयवादी प्रवृत्तीच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत काढलेल्या मोर्चामुळे वाहतुकीची चांगलीच कोंडी झाली होती.
निवेदनामध्ये शिर्डीच्या सागर शेजवळ खून प्रकरणातील फरारी आरोपींना अटक करण्यात यावी, शेजवळ खून प्रकरणातील पोलीस अधिकारी प्रमोद वाघ यांना निलंबित करावे, चिथावणीखोर भाषण करणाऱ्या कमलाकर कोतेला त्वरित अटक करावी, या प्रकरणी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे रद्द करावे, जवखेडा हत्त्याकांडातील संशयित जाधव बंधू व प्रशांत आणि अशोक यांच्या नार्को टेस्टचे जाहीर प्रसारण दूरचित्र वाहिनीवर करावे, राज्यातील दलित, अत्याचार पीडितांचे पुनर्वसन करा आदिं मागण्या करण्यात आल्या आहे.
मोर्चामध्ये तानसेन नन्नावरे, अण्णासाहेब कटारे, किशोर घाटे, गणेश उन्हवणे, विलास पवार, प्रकाश पगारे, नगरसेवक हरिष भडांगे, वैशाली दाणी, संतोष साळवे, शशिकांत उन्हवणे, शेखर भालेराव, संजय अढांगळे, आकाश भालेराव, जगदीश पवार, कैलास तेलोरे, प्रमोद बागुल आदिं सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)