आपुलीच सत्ता, आपणच वैरी !

By किरण अग्रवाल | Published: September 23, 2018 01:45 AM2018-09-23T01:45:14+5:302018-09-23T01:48:17+5:30

नाशिक महापालिकेत आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर निशाणा साधता साधता भाजपाचीच केविलवाणी अवस्था घडून येत आहे. मुख्यमंत्र्यांचे दत्तक विधान लाभूनही व पूर्ण बहुमताची सत्ता असूनही भाजपा पदाधिकाऱ्यांनाच ती सत्ता आपली वाटत नसेल तर नाशिककरांना आपल्याच नशिबाला दोष देण्यावाचून गत्यंतर उरू नये.

Apuilicha power, you are the enemy! | आपुलीच सत्ता, आपणच वैरी !

आपुलीच सत्ता, आपणच वैरी !

Next
ठळक मुद्दे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर निशाणा साधता साधता भाजपाचीच केविलवाणी अवस्था सत्ता मिळवता येण्यापेक्षा ती राबविता येणे कठीण असते,सत्ताधा-यांनाच आरडाओरड करायची वेळ आली आहे.

नाशकातील विकासकामांबद्दल जनता खूष आहे की नाही हे नंतर कळेल; परंतु सद्यस्थितीत महापालिकेतील खुद्द सत्ताधारीच खूश नाहीत, हे चित्र तेथील निर्नायकी अवस्था स्पष्ट करून देण्यास पुरेसे आहे. सत्ताधारी भाजपाचे गटनेते, सभागृहनेते या जबाबदार व संवैधानिक दर्जा असलेल्या पदाधिका-यांसह अन्यही नगरसेवक महासभांमध्ये येता-जाता तक्रारींचे पाढे वाचताना दिसतातच, परंतु महापौरसुद्धा हतबलपणे ‘आजच्यासारखी परिस्थिती कधी उद्भवल्याचे पाहिले नाही’, असे जेव्हा म्हणतात तेव्हा स्वाभाविकच मग सत्ता कुणाची व कुणासाठी असे प्रश्न उपस्थित झाल्याखेरीज राहत नाहीत. सत्ता मिळवता येण्यापेक्षा ती राबविता येणे कठीण असते, या म्हणण्याला बळकटीच प्राप्त करून देणारी ही स्थिती असून, तिला ‘दुर्दैवी’ याशिवाय दुसरे संबोधन वापरता येऊ नये.

नाशिककरांनी गेल्यावेळी मोठ्या अपेक्षेने भाजपाला बहुमत देत महापालिकेत सत्तांतर घडविले असले तरी या पक्षाला तेथे आपली घडी बसवता आलेली नाही. नवीन नाव घेण्यासारखे काही करायचे राहिले बाजूला, पण नित्यनैमित्तिक कामांबाबतच व त्यातही सत्ताधा-यांनाच आरडाओरड करायची वेळ आली आहे. ‘आपण सत्तेत आहोत की नाही, हे तरी किमान सांगा’ असे म्हणण्याची व त्याहीपुढे जात ‘महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू झाली आहे का?’ असा प्रश्न विचारण्याची वेळ सत्ताधाºयांवरच आल्याने भाजपाचेच ‘सोवळेहरण’ घडून येणे क्रमप्राप्त ठरून गेले आहे. येथे वस्त्रहरणाऐवजी ‘सोवळे’ हा शब्द केवळ यासाठी की, आजवरच्या सर्वच सत्ताधाºयांची उणीदुणी काढत व त्यांच्या नावे नाके मुरडत जणू सोवळे नेसून भाजपाने महापालिकेत सत्ता मिळविली आहे. मात्र, हे सोवळेही गळून पडण्याची वेळ या पक्षावर आली. यास दुसरे-तिसरे कुणी फारसे जबाबदारही म्हणता येणार नाही, कारण विरोधीपक्ष तितकेसे सक्षम नाहीत; पण खुद्द स्वपक्षातीलच वर्चस्ववादाची लढाई व त्यातून आकारास आलेले बारभाईपण इतके टोकाला गेले आहे की, त्यातून यापेक्षा दुसरे काही घडून येऊ नये.

महापालिकेच्या महासभेतील विषयांबाबत पक्षाची भूमिका काय असावी यावर चर्चा करण्याकरिता ‘रामायणा’वर आयोजित पक्ष बैठकीत काय ‘महाभारत’ घडले हे सर्वांसमोर आलेच, पण महासभेत खुद्द सत्ताधाºयांनीच असे काही प्रश्न केलेत की पिठासनावरील महापौरांची कोंडी झाली. आज शहर बससेवेला पाठिंबा देणाºयांनी गतकाळात याच सेवेला कसा विरोध नोंदविला होता व आज हातातील झेंडा बदलताच, त्यांच्या भूमिका कशा बदलल्या हे महासभेत मांडले गेल्यानेही भाजपा उघडी पडली. बससेवेच्या प्रश्नावरून महापौरांनी परिवहन समिती गठित करण्यासह संबंधित प्रस्ताव मंजूर केला, परंतु तसे होतांनाही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यात जिथे जिथे परिवहन समिती आहे तिथे तिथे ही सेवा तोट्यात असल्याचे स्पष्ट करून, ठेकेदारामार्फतच बस चालवायची असल्याने परिवहन समितीचा आग्रह का, असे विचारत लोकप्रतिनिधींच्या त्यातील स्वारस्याकडे अप्रत्यक्षपणे अंगुलीनिर्देश करून दिला आहे. त्यामुळे बससेवेसाठी परिवहन समिती की स्वतंत्र कंपनी, असा प्रश्न असला तरी उद्या सत्ताधारी भाजपाचा मुखभंगच होण्याची चिन्हे आहेत.

महत्त्वाचे म्हणजे, सत्ताधाºयांत कुणाचा कुणाला पायपोस नसल्यामुळे प्रत्येकवेळी, प्रत्येक बाबतीत तोंडावर आपटण्याची वेळ येत आहे. करवाढ, आयुक्तांवरील अविश्वास प्रस्ताव आदींबाबत तेच झाले, आता बससेवेबाबतही तेच होऊ घातले आहे. त्यामुळेच सत्ताधारी पक्षाचेच नगरसेवक, ‘ही आपली सत्ता आहे का?’ असा प्रश्न महासभांमध्ये विचारू लागले आहेत. विशेष असे की, महापौरही यावर म्हणतात की, ‘आम्ही वीस वर्षांपासून नगरसेवक आहोत, पण आजच्यासारखी परिस्थिती कधी उद्भवली नव्हती’. मग तसे असेल तर या स्थितीला जबाबदार कोण? सत्ता राबविता न येणारेच ना? येथे याचसंदर्भात शिवसेनेच्या आरोपाकडे दुर्लक्ष करता येऊ नये. शहरात शिवसेनेचाही एक आमदार व एक खासदार आहेत, पण ते महापालिकेत डोकावत नाहीत. भाजपाचे तिन्ही आमदार उठता बसता महापालिकेत लुडबुड करतात, म्हणूनही ही अवस्था ओढवली असेल तर काय सांगावे? भाजपाची सत्ता असूनही भाजपाच्याच वाट्याला येणारे हे वैरीपण विषण्ण करणारेच आहे. अर्थात, नेते अधिक व कार्यकर्ते कमी झाल्यावर दुसरे काय होणार? महापालिकेत व भाजपात तेच झालेले आहे.

Web Title: Apuilicha power, you are the enemy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.