मंजुरी मिळाली, मात्र कामे रखडणार
By Admin | Updated: August 13, 2015 00:02 IST2015-08-13T00:01:17+5:302015-08-13T00:02:42+5:30
निधीची अडचण : आरोग्य केंद्रांची अवस्था

मंजुरी मिळाली, मात्र कामे रखडणार
नाशिक : जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत जिल्ह्णातील डझनभर प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारत बांधकामांना वाढीव अंदाज पत्रकांसह प्रशासकीय मान्यता देण्यात आली खरी; मात्र ही कामे डिसेंबर-जानेवारीपर्यंत रखडण्याची चिन्हे आहेत. कारण कामांना पूर्ण निधी असल्याखेरीज या कामांचे निविदा व कार्यारंभ आदेश काढण्यास तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
जिल्हा परिषदेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत नव्याने मंजूर झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या मंजुरीवरून सदस्य व आरोग्य विभागात जुंपली होती. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे यांनी आदिवासी भागातील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बांधकामासाठी नऊ कोटी, तर बिगर आदिवासी भागातील आरोग्य केंद्रांसाठी चार कोटींचा निधी उपलब्ध असून, त्यापैकी मागील दायित्व जाता नव्याने मंजुरीस ठेवण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मान्यतेसाठी जास्त निधी लागणार असल्याने नेमक्या किती प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या व किती रकमेच्या कामांना मंजुरी द्यावी, असा प्रश्न आरोग्य विभागाकडून उपस्थित करण्यात आला होता. मात्र सदस्य व पदाधिकाऱ्यांच्या रेट्यात मंजुरीसाठी ठेवण्यात आलेल्या सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत काही अटी- शर्तींनुसार हे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. प्रत्यक्षात आता ही सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांची कामे रखडण्याची चिन्हे आहेत. कारण प्रशासकीय मान्यता देताना प्रस्तावाच्या पूर्ण रकमेस मान्यता देण्यात येते. आता जोपर्यंत अंदाजपत्रकानुसार संपूर्ण प्रमाणात निधी उपलब्ध होणार नाही, तोपर्यंत निविदा व कार्यारंभ आदेश काढण्यास तांत्रिक अडचण येण्याची शक्यता आहे. या प्रशासकीय मान्यता निधीच्या उपलब्धतेवरच देण्यात आलेल्या असल्याने आता डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात जिल्हा नियोजन समितीकडून विविध विभागांच्या निधीबाबत पुनर्नियोजन करण्यात येईल. तेव्हाच निधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे आणि तेव्हाच ही कामे मार्गी लागण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)