स्मार्ट सिटी कंपनीवर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती
By Admin | Updated: April 30, 2017 02:02 IST2017-04-30T01:54:35+5:302017-04-30T02:02:53+5:30
नाशिक : स्मार्ट सिटी अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या कंपनीच्या संचालक मंडळावर महापालिकेतील नवनिर्वाचित पदाधिकारी यांची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

स्मार्ट सिटी कंपनीवर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती
नाशिक : स्मार्ट सिटी अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या एसपीव्ही अर्थात नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या कंपनीच्या संचालक मंडळावर महापालिकेतील नवनिर्वाचित पदाधिकारी यांची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. याशिवाय, कंपनीसाठी विविध पदांच्या भरतीची प्रक्रिया तातडीने राबविण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत.
दहा महिन्यांपूर्वी स्मार्ट सिटी कंपनी स्थापन करण्यात येऊन तिची नोंदणी करण्यात आली होती. या कंपनीवर मागील पंचवार्षिक काळातील पदसिद्ध म्हणून महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, सभागृहनेता सुरेखा भोसले, स्थायी समिती सभापती सलीम शेख व विरोधी पक्षनेता कविता कर्डक यांची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, नाशिक महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली. त्यामुळे कंपनीच्या संचालक मंडळावर नूतन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव शनिवारी (दि.२९) झालेल्या एसपीव्हीच्या बैठकीत ठेवण्यात आला होता. त्यानुसार, नवनिर्वाचित महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात येऊन त्यांचा कुंटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कंपनीसाठी अभियंता, कंपनी सेक्रेटरी, मुख्य लेखाधिकारी, आयटी प्रमुख, आदिंच्या नियुक्यांबाबतही चर्चा करण्यात आली. त्यासाठी वेगवेगळे पर्याय समोर आले. सदर पदे ही अनुभवी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांमधून भरणे अथवा खुल्या पद्धतीने जाहिरात काढून भरती करणे याबाबतचे अधिकार आयुक्तांना देण्यात आले.