मुहूर्तावरही भरता येणार अर्ज
By Admin | Updated: January 26, 2017 00:24 IST2017-01-26T00:24:16+5:302017-01-26T00:24:31+5:30
महापालिकेचा सल्ला : उमेदवारांना सर्व ना हरकत दाखले चोवीस तासांत

मुहूर्तावरही भरता येणार अर्ज
नाशिक : निवडणुकीसाठी मुर्हूतावर अर्ज भरणाऱ्यांना विशिष्ट दिवस महत्त्वाचा असतो आणि यंदा तर आॅनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणार आहेत, त्यामुळे अडचण निर्माण झालेल्या इच्छुक उमेदवारांना महापालिकेने तोडगा काढून दिला असून, आॅनलाइन केव्हाही अर्ज दाखल करा आणि त्याची प्रिंट काढून प्रत्यक्ष अर्ज मुहूर्तावर भरा, असा सल्ला बुधवारी पालिकेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत देण्यात आला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांना आॅनलाइन अर्ज दाखल करणे आणि अन्य प्रक्रिया समजावून सांगण्यासाठी विशेष बैठक राजीव गांधी भवनातील स्थायी समिती सभागृहात घेण्यात आली. आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी यावेळी मार्गदर्शन केले. महापालिकेच्या निवडणुकीसाठी अनेकांना विशिष्ट दिवशीच अर्ज दाखल करायचा असतो. आता आॅनलाइन अर्ज भरताना सर्व्हर डाउन झाला किंवा अन्य अडचणी आल्या तर त्यावर काय करणार याविषयी कृष्ण यांनी मार्गदर्शन केले. महापालिकेच्या वतीने एक खिडकी योजनेअंतर्गत दोन कर्मचाऱ्यांची खास उमेदवारांना मदत आणि मार्गदर्शन करण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे. आॅनलाइन उमेदवारी अर्ज चोवीस तासांत केव्हाही दाखल करता येईल, त्याची प्रिंट मुहूर्तावर सादर करता येईल. काही शपथपत्र नोटरी करण्याची गरज नाही, तसेच एक खिडकी योजनेत ना हरकत प्रमाणपत्रासाठी इच्छुकांनी अर्ज दाखल केल्यानंतर दुसऱ्या दिवशीपर्यंत दाखल करण्यात येईल. सर्व विभागीय कार्यालयात ही व्यवस्था नसल्याचे एका कार्यकर्त्याने निदर्शनास आणून दिल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्तीनंतर ही व्यवस्था केली जाईल असे सांगितले. दरम्यान, महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी २७ जानेवारी ते ३ फेबु्रवारी असा असून, या दरम्यान २९ जानेवारीस रविवार आहे. मात्र, रविवारीही उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.